जादूटोण्याचा आक्रीत प्रकार उघड, जीवंत माणसाला स्मशानात नेलं अन्…

रायगड : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील नाडे गावात पैशांचा पाऊस पाडण्यासाठी जादूटोणा करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मध्यरात्रीनंतर स्मशानभूमीत हा अघोरी विधी सुरू असताना स्थानिक ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत या टोळीचा पर्दाफाश केल्याचं उघडकीस आले आहे.
या अघोरी प्रकारात मानवी कवटी, पेटलेला नारळ, लिंबू, शंख, अगरबत्ती, भगवे कापड, होमासाठी लागणाऱ्या समिधा, भस्म, गोमुत्र आणि इतर साहित्यांचा वापर केला जात होता. टोळीतील काही जणांनी एका जिवंत व्यक्तीला वेगळ्या पद्धतीने फिरवत अघोरी विधी करत असल्याचे ग्रामस्थांना दिसले.
त्यांनी जादूटोणा करणाऱ्यांना अडवले असता, संशयितांनी त्यांच्या अंगावर गाडी घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच पेण पोलिसांनी वेळीच धाव घेत तिघांना अटक केली. मात्र, या टोळीतील इतर साथीदार फरार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, अलीकडेच कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील कुराण नावाच्या शेतातही अशाच प्रकारच्या जादूटोण्याचा प्रकार समोर आला होता. बाभळीच्या झाडावर लिंबू, दाभण, बाहुल्या आणि काही मुलींचे फोटो टांगण्यात आले होते. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.