दारूच्या व्यसनातून पेटला संसाराचा वाद; दोन चिमुकल्यांच्या डोळ्यांदेखत आईचा जीव घेतला, खराडीत खळबळ


पुणे : पुण्यातील खराडी परिसरात कौटुंबिक वादाने अत्यंत भीषण वळण घेत एका ३२ वर्षीय महिलेचा जीव गेला आहे. पती-पत्नीमधील सुरू असलेल्या वादातून संतापलेल्या पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या दाम्पत्याला दोन लहान मुले असून, त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

खराडीतील भनगाई वस्ती येथे राहणारी किरण दयाराम बाबर (वय ३२) ही घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हातभार लावत होती. तिचा पती दयाराम तोताराम बाबर (वय ३६) हा एका खासगी संस्थेत सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. आर्थिक अडचणी आणि पतीच्या मद्यपानाच्या सवयीमुळे घरात वारंवार वाद होत असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटेच्या सुमारास घरातील सर्वजण झोपेत असताना ही घटना घडली. किरण घरात झोपलेली असताना तिच्यावर अचानक धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. गळ्यावर गंभीर वार केल्यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. हल्ला इतका क्रूर होता की तिच्या चेहऱ्यावरही गंभीर जखमा झाल्याचे तपासात उघड झाले आहे.

घरातील गोंधळ ऐकून नातेवाईक आणि शेजारी धावून आले. त्यानंतर किरणला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, मृत महिलेचा भाऊ दादू सजन बोरसे (वय २३) यांनी खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत पती दयाराम बाबर याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

घटनेनंतर आरोपी पती फरार झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. मोबाईल लोकेशन, नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींकडे चौकशी सुरू आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसून त्याचाही शोध घेतला जात आहे.

प्राथमिक तपासात कौटुंबिक कलह हे हत्येमागील मुख्य कारण असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र यामागे अन्य काही कारण होते का, याचाही तपास सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन जाधव करत आहेत.

 

एका क्षुल्लक वादाने दोन लहान मुलांचे मातृछत्र हिरावले असून, खराडी परिसरात या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!