पहाटे पाच वाजता पुण्याच्या ‘त्या’ गल्लीत जमायची गर्दी; पोलिसांनी छापा टाकला अन् सगळंच बाहेर आलं, 61 जण ताब्यात

पुणे : कोंढवा परिसरात गांजाची विक्री आणि सेवन करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र राज्य अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स आणि कोंढवा पोलिसांनी संयुक्तपणे मोठी कारवाई केली. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ‘नशामुक्त भारत’ अभियान आणि राज्य सरकारच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणांतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत 100 हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले.
कोंढव्यातील शिवनेरी गल्ली, काकडे वस्ती आणि दर्याशेजारील भागात पहाटेच्या वेळी गांजाची किरकोळ विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पहाटे 5 ते सकाळी 10 या वेळेत पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.

या कारवाईत गणेश सिद्धू पाटोळे आणि अजू अहमद शेख या दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 3 किलो गांजा, 26 हजार 960 रुपये रोख, 35 मोबाईल फोन तसेच 14 दुचाकी आणि तीनचाकी वाहने जप्त करण्यात आली.


दरम्यान, 17 ऑगस्ट रोजी अमली पदार्थ विक्रीच्या हॉटस्पॉटवर पोलिसांनी विशेष गस्त घातली. अवघ्या दोन तासांत गांजा खरेदी करण्यासाठी आलेल्या 61 जणांना ताब्यात घेण्यात आले. तसेच परिसरात गांजाचे सेवन करणाऱ्या 41 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
ताब्यात घेतलेल्या व्यक्तींना पोलिस ठाण्यात आणून गांजाच्या सेवनामुळे होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक दुष्परिणामांबाबत समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
कोंढवा परिसरातील अमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. गेल्या दोन महिन्यांत अमली पदार्थ विक्री करणाऱ्या सराईत टोळ्यांविरोधात मकोका कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. तसेच NDPS कायद्यान्वये 8 गुन्हे दाखल करून 21 जणांना अटक करण्यात आली असून, आतापर्यंत 5 लाख 6 हजार 785 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
“परिसरात गांजाची विक्री, बाळगणे किंवा सेवन खपवून घेतले जाणार नाही. ही मोहीम यापुढेही तीव्रतेने सुरू राहील,” असा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी दिला आहे.