मदतीच्या बहाण्याने जवळीक, रात्री घरात एन्ट्री अन् थेट ११२ वर फोन; २८ वर्षीय विवाहितेच्या तक्रारीने PSI अडचणीत!

बीड : सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या छळाची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या २८ वर्षीय विवाहित महिलेच्या प्रकरणात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. “तुझं काम करून देतो, केस मार्गी लावतो” असं सांगत तिच्याशी जवळीक वाढवणाऱ्या श्रेणी पोलीस उपनिरीक्षकावरच महिलेने घरात घुसून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीनंतर बीडच्या वडवणी पोलीस ठाण्यात गणेश राठोड यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या निर्देशानंतर ही कारवाई झाली.
सासरच्या छळाची तक्रार, त्यानंतर PSI संपर्कात

वडवणी तालुक्यातील या २८ वर्षीय विवाहित महिलेने सासरच्या मंडळींविरोधात छळाची तक्रार दाखल केली होती. याच प्रकरणाच्या अनुषंगाने गणेश राठोड यांनी महिलेशी संपर्क साधला. “तुझी केस मी मार्गी लावून देतो” असं सांगत त्यांनी तिचा विश्वास संपादन केल्याचा आरोप आहे.


त्यानंतर शुक्रवारी रात्री “भेट घ्यायची आहे” असं सांगत राठोड महिलेच्या घरी गेल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. घरी गेल्यानंतर त्यांनी महिलेच्या इच्छेविरोधात जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. महिलेने विरोध केल्यानंतर धमकी देत तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
प्रकारानंतर ११२ वर संपर्क
घटनेनंतर पीडित महिलेने तातडीने ११२ या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून मदत मागितली. मात्र, सुरुवातीला वडवणी पोलिसांकडून तक्रार नोंदवून घेण्यासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप महिलेने केला. त्यानंतर तिने आणि तिच्या नातेवाईकांनी थेट बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण घटना सांगितली.
प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांनी संबंधित पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले. त्यानंतर वडवणी पोलीस ठाण्यात गणेश राठोड यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
ASI पदावरून PSI पदावर पदोन्नती
गणेश राठोड हे यापूर्वी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांची श्रेणी पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच ग्रेड पीएसआय पदावर पदोन्नती झाली होती. त्यांच्या शासकीय सेवेतून निवृत्तीला सुमारे तीन वर्षे बाकी असल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे, ज्या वडवणी पोलीस ठाण्यात राठोड यांनी सेवा बजावली, त्याच पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, महिलेने केलेल्या आरोपांचा तपास सुरू असून, या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाई तपासानंतर स्पष्ट होणार आहे.