यवतजवळील अपघातात दोघांच्या मृत्यूप्रकरणी बोरीभडक येथील कारचालकावर गुन्हा दाखल; डिव्हाडर तोडून विरुद्ध दिशेने कारला ठोकर …


उरुळीकांचन : दौंड तालुक्यातील यवत ग्रामपंचायत हद्दीतील पुणे-सोलापूर महामार्गावरील शेरू हॉटेलसमोर बुधवार (२० ऑगस्ट) रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास तीन चारचाकी गाड्यांचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दोन जण जागीच मृत्यूमुखी पडले असून पाचजण जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी स्विफ्ट कार चालकावर बेदरकारपणे वाहन चालवल्याप्रकरणी यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात अशोक विश्वनाथराव थोरबोले (वय ५७, रा. उरुळी कांचन, मूळ गोजवडा, ता. वाशी, जि. धाराशिव) व गणेश धनंजय दोरगे (वय २८, रा. यवत रावबाचीवाडी, ता. दौंड) यांचा मृत्यू झाला आहे. तर ज्ञानेश्वर विश्वनाथ थोरबोले (वय ४९, रा. उरूळी कांचन), राकेश मारुती भोसले (स्विफ्ट चालक, रा. बोरीभडक, ता. दौंड), सचिन रमेश दोरगे (रा. यवत, ता. दौंड) , वैभव रमेश दोरगे (रा. यवत, ता. दौंड) व हृषीकेश बाळासाहेब जगताप हे जखमी झाले असून यांमधील ज्ञानेश्वर थोरबोले हे गंभीर जखमी झाले आहेत.

याप्रकरणी जखमी ज्ञानेश्वर थोरबोले यांनी यवत पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून स्विफ्ट कार चालक राकेश मारुती भोसले (रा. बोरीभडक, या. दौंड, जि. पुणे.) याचेवर बेदरकारपणे आणि निष्काळजीपणाने वाहन चालवून रहदारी नियमांचे उल्लंघन केले व हा अपघात घडवून आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघाताची सविस्तर हकीकत अशी की बुधवारी थोरबोले हे आपल्या मोठ्या भावासमवेत स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एमएच १२ टीवाय ७५३१ यांमधुन सोलापूर-पुणे महामार्गावरून यवत ग्रामपंचायत हद्दीतील शेरू हॉटेलसमोर आले. त्यावेळी पुणे-सोलापूर महामार्गावरुन राकेश भोसले हा आपल्या लाल रंगाच्या स्विफ्ट कार क्रमांक एमएच १२ वायडब्ल्यू.५०५२ मधून भरधाव वेगात आला व महामार्गावरील डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेला जाऊन समोरून येणाऱ्या थोरबोले यांच्या स्विफ्ट डिझायर कारला तसेच दुसरी स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एमएच १२ एनयु ५५०१ ला जोरदार धडक दिली.

धडकेची तीव्रता इतकी होती की स्विफ्ट डिझायर कारमधील प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तिन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या स्विफ्ट कार चालकाचा रक्त नमुना घेतला असून तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतर चालकाने मद्यप्राशन केले होते की नाही, याबाबत खुलासा होणार आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोविंद भोसले हे करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!