एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांना दणका! जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्वतः बसून केल्या बदल्या…

उरुळीकांचन : जिल्हा प्रशासनातील महसूल सहायक, सहायक महसूल अधिकारी, मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) शिपाई, वाहनचालक प्रवर्गातील ३३६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बुधवारी केल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील पहिल्यांदाच इतक्या पारदर्शकपणे बदल्या होऊन जिल्हाधिकारी कार्यालय, हवेली तालुक्यातील क्रिम पोस्टवर वर्षोनुवर्षे रिंगण घालून बसलेल्या कर्मचाऱ्यांना मात्र बाहेरचा रस्ता दाखविला आहे.

पुणे जिल्ह्यात महसूल कर्मचाऱ्यांचे बदलीचे समिकरण हे पूर्वी अर्थिक तडजोडींवर होऊन जिल्हाधिकारी कार्यालय , हवेली तालुक्यात महत्त्वाचा क्रिमपोस्टवर होऊन या बदल्यांत कोट्यावधींची उड्ढाने होत असल्याचे बदल्यांचे चित्र होते. काही जागांवर मंडळ अधिकारी पदांसाठी थेट मंत्रालय स्तरावरून फिल्डिंग लावून पोस्टसाठी स्पर्धा सुरू असल्याचे चित्र होते. मात्र जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या प्रक्रियेला छेद देऊन अतिशय पारदर्शकतेने स्वतः हा बसून कर्मचारी बदल्या केल्या आहेत.
जिल्हाधिकारी डुडी यांनी कर्मचाऱ्यांच्या समोर ऑनलाइन पद्धतीने बदल्या केल्याने तळ ठोकून बसलेल्या जिल्हा प्रशासनातील कर्मचाऱ्यांना झटका बसला आहे. पुणे आणि हवेलीतच फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता भोर, वेल्हा, जुन्नर, आंबेगाव, इंदापूर, बारामतीचा रस्ता धरावा लागणार आहे.


डुडी यांनी स्वतः बसून बदली प्रकिया राबविल्याने कर्मचाऱ्यांनादेखील हालचाल करता आली नाही. तीन वर्षांपेक्षा अधिक काळ तालुक्यात राहिलेले कर्मचारी आणि पाच वर्षांपेक्षा विभागात राहिलेले अधिकारी बदलीस पात्र होते. समुपदेशनाने बदल्यांची कार्यवाही पार पडली. कर्मचाऱ्यांच्या बदल्या त्यांच्या मनाप्रमाणे करण्यात आल्या. त्यांना ज्येष्ठतेनुसार पर्याय देण्यात आले.
महसूल विभागातील ३३६ कर्मचाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या.
तलाठी, मंडल अधिकारी, सहायक अधिकारी, शिपाई व वाहनचालकांचा समावेश.
वशिलेबाजीला आळा बसला आणि ‘नो करप्शन’चा संदेश.
स्थानिकांना दूरच्या तालुक्यांत बदल्या.
संवर्ग कर्मचाऱ्यांची संख्या
महसूल सहायक ७२
सहायक महसूल अधिकारी ३६
मंडल अधिकारी ३६
तलाठी १३६
शिपाई ५०
वाहनचालक ०६
जी नवीन लोक आहेत. प्रामाणिकपणे ग्रामीण भागात त्यांनी काम केलेले आहे. त्यांना शहरात काम करण्याची संधी या बदली प्रकियेतून मिळणार आहे. काही कर्मचाऱ्यांना शहरातील काम समजून घेताना अडचणी येतील. मात्र काही ही अडचण नाही. मीदेखील या ठिकाणचे काम शिकत आहे. ते देखील नक्कीच जिल्हाधिकारी कार्यालयातील काम शिकतील, असा मला विश्वास वाटतो.
जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, पुणे