निवडणुकांपूर्वीच महायुतीला धक्का; शिंदे गटात बंडाची ठिणगी, ‘या’ बंडाचा कुणाला बसणार फटका?


मुंबई : राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून जास्तीत जास्त जागांवर दावा करण्यासाठी रणनीती आखली जात आहे. मात्र, जागावाटपाची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीसमोर अंतर्गत मतभेदाचे आव्हान निर्माण झाले आहे.

शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते श्रीकांत देशपांडे यांनी अमरावती शिक्षक मतदारसंघातून दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महायुतीकडून अधिकृत उमेदवाराची घोषणा होण्यापूर्वीच त्यांनी हा निर्णय घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

श्रीकांत देशपांडेंचे दोन उमेदवारी अर्ज

श्रीकांत देशपांडे यांनी पहिला अर्ज शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवाराच्या स्वरूपात दाखल केला आहे. तर दुसरा अर्ज त्यांनी अपक्ष म्हणून दाखल केला आहे. पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही, तरी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेणार नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.

पक्षाचे तिकीट न मिळाल्यास ‘शिक्षक आघाडी’च्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्धारही देशपांडे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण असेल आणि देशपांडे पुढे कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

‘तिकीट मिळाले नाही तरी निवडणूक लढणार’

श्रीकांत देशपांडे यांनी आपल्या उमेदवारीवर ठाम भूमिका मांडली आहे. ‘मी १९९२ पासून शिवसेनेत आहे आणि पहिल्या दिवसापासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. त्यामुळे या जागेवर आणि तिकिटावर माझाच पहिला अधिकार आहे. उमेदवारी मिळणे हा माझा हक्क आहे. तिकीट नाकारले तरी मी निवडणूक लढणारच,’ असे देशपांडे यांनी म्हटले आहे.

शिक्षक मतदार सुज्ञ असून ते योग्य निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले. शिक्षकांच्या विविध प्रश्नांवरही त्यांनी आपली भूमिका मांडली.

श्रीकांत देशपांडे यांची राजकीय पार्श्वभूमी

श्रीकांत देशपांडे यांनी २०१४ मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर अमरावती शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ते आमदार म्हणून निवडून आले होते.

त्यानंतर २०२० मध्ये त्यांनी ‘शिक्षक आघाडी’च्या उमेदवारीवर निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी अमरावती शिक्षक मतदारसंघावर दावा केला आहे.

महायुतीसमोर समन्वयाचे आव्हान

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीकडून अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर झालेला नाही. अशा परिस्थितीत देशपांडे यांनी दोन अर्ज दाखल केल्याने महायुतीसमोर उमेदवारी आणि जागावाटपाचा तिढा सोडवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात विविध जागांवरून दावे केले जात आहेत. त्यामुळे अमरावती शिक्षक मतदारसंघातील पुढील घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत.

आता महायुतीकडून अधिकृत उमेदवाराची घोषणा कधी होते आणि श्रीकांत देशपांडे यांच्या उमेदवारीबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!