पुण्यात तयार होतोय ६ पदरी रस्ता, दोन महामार्गांना जोडणार, जाणून घ्या…

पुणे : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील वाहतूक समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महत्त्वाकांक्षी रस्ते विकास प्रकल्पाला राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे.
या प्रकल्पास ४,२०६ कोटी ८८ लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. एकूण ५३ किमी लांबीच्या या मार्गाने दोन महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गांना जोडले जाणार आहे. हा मार्ग पुण्यासाठी बाह्यवळण रस्त्याचा पर्याय ठरणार आहे. या प्रकल्पांतर्गत तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग आणि चाकण ते शिक्रापूर सहा पदरी रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे.
या प्रकल्पामुळे चाकण परिसरातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल. आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपुलांचे बांधकाम देखील करण्यात येणार आहे. यामुळे हा एक महत्वाचा प्रकल्प असल्याचे सांगितले जात आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्ग हा मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग ४८ पासून सुरू होतो आणि पुणे-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ पर्यंत जातो.
त्यामुळे हा रस्ता दोन प्रमुख महामार्गांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. परिणामी, शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. यामुळे वेळेची मोठ्या प्रमाणावर बचत होणार असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळामार्फत बीओटी तत्त्वावर हे काम करण्यात येणार आहे. ज्यामुळे प्रकल्पात खाजगी गुंतवणूक देखील होणार आहे.