पुण्यात वैज्ञानिकाकडून ५० वर्षीय महिलेवर बलात्कार, फसवणूक करून कोट्यवधी रुपयेही उकळले…

पुणे : एका कथित वैज्ञानिकाने एका ५० वर्षीय महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केला आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे, असं सांगत आरोपीनं वारंवार तिचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडीस आली आहे. ही घटना पुण्यातील वाकड परिसरातून समोर आली आहे.
नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडितेला व्यवसायात भागीदारी देतो म्हणत कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. यानंतर आरोपीने पीडितेला बेदम मारहाण देखील केली आहे.
या प्रकरणी पीडित महिलेनं वाकड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निशांत जगदीश व्यास असं गुन्हा दाखल झालेल्या ३७ वर्षीय आरोपीचं नवा असून तो पुण्यातील नांदेड सिटी परिसरात राहतो, आरोपीनं ८ एप्रिल २०२३ ते १३ एप्रिल २०२५ या काळात ५० वर्षीय पीडित महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार करत तिची आर्थिक फसवणूक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला पुण्यातील वाकड परिसरात एकट्याच राहतात. त्यांची आई आणि मुलगा अधून मधून त्यांच्या घरी ये-जा करत असतो. जानेवारी २०२३मध्ये फिर्यादी यांच्या नातेवाईक मुंबईच्या मुलुंड येथील एका रुग्णालयात कर्करोगाचे उपचार घेत होत्या. त्यावेळी फिर्यादी त्यांच्यासोबत रुग्णालयात राहत होत्या. तेव्हा तिथे आरोपी व्यासही उपचार घेत होता. दरम्यान, फिर्यादी आणि आरोपीची ओळख झाली होती.
याच ओळखीतून पुढे दोघांची मैत्री वाढत गेली. आरोपी व्यासने आपण वैज्ञानिक असल्याचं पीडितेला सांगितलं. तसेच पुण्यात आपली लॅब आहे, असंही त्याने सांगितलं. पुढे ओळख वाढल्यानंतर आरोपीनं पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले.
दरम्यानच्या काळात आरोपीनं लॅबमध्ये भागीदारी देतो असं सांगत पीडित महिलेकडून कोट्यवधी रुपये घेतले, असा आरोप महिलेनं केला आहे. जानेवारी २०२५ मध्ये आरोपी व्यासने फिर्यादी याच्या घरी जाऊन त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादींचे बोट आणि मनगट मोडले. पोलिसांत तक्रार दिली, तर जीवे मारण्याची धमकीही आरोपीनं दिली होती. याप्रकरणी आता वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.