धोंडे जेवणासाठी वाट बघून पत्नी-सासू झोपी गेल्या, रात्री तो आला अन् सारं संपलं, घटनेने नगर हादरलं…

नगर : कौटुंबिक वादातून घरजावयाने पत्नी आणि सासूची हत्या केली. दोघींचा खून करून घरजावयाने नगर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही घटना राहुरी तालुक्यातील कात्रड येथे मंगळवारी (ता. १५) रात्री ही घटना घडली. अधिक महिन्यानिमित्त आयोजित धोंडे जेवणाच्या कार्यक्रमानंतर रात्री ही घटना घडली आहे.
पत्नी नूतन साबळे (वय. २३ ), सासू सुरेखा दांगट (वय. ४५) अशी मयतांची नावे आहेत. सागर साबळे असे आत्महत्या केलेल्या घरजावयाचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी साबळे याची पत्नी माहेरी राहत होती. त्यावरून तिच्यासोबत आणि सासूसोबत त्याचे वाद होते. पत्नी सासरी येत नसल्याने अखेर सागर तिच्या माहेरी येऊन राहण्याचा पर्याय निवडला. तेथे राहून तो एमआयडीसीमध्ये नोकरी करीत होता.
पंधरा ऑगस्टच्या दिवशी सासूने धोंडे जेवण आयोजित केले होते. दिवसभरात अन्य पाहुणे येऊन गेले. मात्र, रात्र झाली तरी सागर आलाच नाही. त्यामुळे सर्व जण झोपी गेले. त्यानंतर घरी आलेल्या सागरने दोघींचा खून केला.
आपल्या लहान मुलीला त्याने नातेवाइकांच्या घरी नेऊन सोडले आणि नंतर पसार झाला. नातेवाइकांना शंका आल्याने त्याने दांगट यांच्या घरी येऊन पाहिल्यावर ही घटना उघडकीस आली.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन जावयाचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना सागरने नगरजवळच्या एमआयडीसी परिसरात सागर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. कौटुंबिक वादातून ही हत्या-आत्महत्या झाल्याची माहिती आहे.