महाराष्ट्रातील युती ठाकरेंनीच तोडली, भाजपनं नाही; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य…

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील युती ठाकरेंनी तोडली, भाजपने नव्हे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. दिल्ली येथे एनडीएच्या खासदारांची बैठक सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीला संबोधित केले असून यात त्यांनी कॉँग्रेस आणि शिवसेनेवर जहरी टीका केली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्याला एनडीए म्हणून काम करायचे आहे, काँग्रेसप्रमाणे भाजप अहंकारी नाही, त्यामुळे भाजप सत्तेवरून पायउतार होणार नाही, असा विश्वास देखील त्यांनी बैठकीत संबोधित करताना दिला.
काँग्रेसच्या स्वार्थामुळे प्रणव मुखर्जी, शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी अनेक नेत्यांचे खच्चीकरण केले, असे म्हणत एनडीए बैठकीत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या अहंकारी उदाहरणांचा दाखला दिला आहे.

पुढे ते म्हणाले, शिवसेना भाजपसोबत सत्तेत होती, त्यावेळी सामना वृत्तपत्रात माझ्यावर टीका केली जायची. कारण नसताना वाद निर्माण होत असे. आम्ही अनेक वेळा सहन केले. तुम्हाला सत्तेत पण राहायचे आहे, आणि तुम्हाला आमच्यावर टीका पण करायची आहे.
या दोन गोष्टी एकत्र कशा चालतील? बिहारमध्ये कमी संख्या असतानाही नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. एकनाथ शिंदे आले आणि त्यांना मुख्यमंत्रीपद दिले. आमचे मित्र आमच्यासाठी महत्वाचे आहेत.
आपण एकत्र राहू, सर्वांचा आदर केला जाईल. दरम्यान, महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, असे ही मोदी म्हणाले.