नमाज सुरू असताना मशिदीत बॉम्बस्फोट; १७ जणांचा मृत्यू, ८० जखमी…!

पेशावर : पाकिस्तानमधील पेशावरमध्ये मशिदीत बॉम्बस्फोट झाला आहे. येथील पोलिस वसाहतीमधील मशिदीमध्ये भाविक नमाज पठण करत होते, त्यावेळी अचानक बॉम्बस्फोट झाल्याचं वृत्त आहे. या बॉम्बस्फोटात १७ जणांचा मृत्यू झाला आहे तर ८० जण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळावर पोलीस आणि तपास यंत्रणा पोहचल्या असून तपास सुरु आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं घेतलेली नाही. पण या बॉम्बस्फोटात मोठं नुकसान झाल्याचं वृ्त्त आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉम्बस्फोट झाल्यानंतर मशिदीचं छत कोसळलं आहे. नमाज सुरु असताना हल्लेखोरानं बॉम्बनं स्वत:ला उडवलं. या हल्ल्यातील मृताची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
हाती आलेल्या वृत्तानुसार, बॉम्बस्फोटामुळे मशिदीचा बराचसा भाग कोसळला आहे. त्यामुळे ढिगा-याखाली अनेक भाविक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या स्फोटानंतर पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचं पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मशिदीमध्ये सध्या बचावकार्य सुरू आहे. त्याशिवाय जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
