छोट्या दुकानदारांसाठी मोठी बातमी! GST रजिस्ट्रेशन नंबरसाठी बदलले नियम; १ डिसेंबरपासून नवे नियम लागू

मुंबई : व्यवसाय सुरू करताना अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. मात्र, व्यवसाय बंद करताना जीएसटी नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया अनेक छोट्या दुकानदार आणि व्यापाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत होती.
आता या प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने (CBIC) २५ नोव्हेंबर रोजी यासंदर्भात नवा आदेश जारी केला आहे. त्यानुसार, १ डिसेंबर २०२६ पासून जीएसटी रजिस्ट्रेशन रद्द करण्याची प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे.

नव्या नियमानुसार, ज्या व्यापाऱ्यांचे सर्व जीएसटी रिटर्न वेळेत भरलेले आहेत आणि कोणतीही कराची थकबाकी नाही, त्यांना ऑनलाइन पद्धतीने जीएसटी नंबर रद्द करता येणार आहे. विशेष म्हणजे, अशा अर्जांना थेट ऑनलाइन मंजुरी मिळणार असून, त्यासाठी अधिकाऱ्यांच्या तपासणीची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे छोट्या दुकानदारांना सरकारी कार्यालयांचे हेलपाटे मारण्याची गरज कमी होणार आहे.

१. चोख हिशोब असल्यास थेट ऑनलाइन मंजुरी
नव्या नियमांनुसार, व्यापाऱ्यांचे सर्व व्यवहार आणि कागदपत्रे व्यवस्थित असतील, तर जीएसटी रजिस्ट्रेशन रद्द करण्याचा अर्ज ऑनलाइन प्रणालीद्वारे मंजूर केला जाईल. अर्जामध्ये नमूद केलेल्या तारखेपासून नोंदणी रद्द मानली जाईल. तसेच, अधिकृत रद्दीकरण प्रमाणपत्र (FORM GST REG-38) जीएसटी पोर्टलवर उपलब्ध होईल.

मात्र, थेट ऑनलाइन मंजुरी मिळवण्यासाठी व्यापाऱ्यांना पुढील अटी पूर्ण कराव्या लागतील.
– सर्व प्रलंबित जीएसटी रिटर्न वेळेत दाखल केलेले असावेत.
– कोणताही कर थकीत नसावा.
– व्याज, विलंब शुल्क किंवा दंडाची रक्कम बाकी नसावी.
– जीएसटी विभागाकडून निश्चित करण्यात आलेली कोणतीही थकबाकी शिल्लक नसावी.
२. थकबाकी असल्यास अधिकाऱ्यांकडून तपासणी
दुसरीकडे, एखाद्या व्यापाऱ्याचा जीएसटी रिटर्न दाखल करणे बाकी असेल किंवा कर, व्याज, विलंब शुल्क अथवा दंडाची थकबाकी असेल, तर त्याचा अर्ज थेट ऑनलाइन मंजूर होणार नाही. अशा अर्जांची तपासणी संबंधित जीएसटी अधिकारी करणार आहेत.
अधिकारी व्यापाऱ्याच्या खात्याची आणि कागदपत्रांची पडताळणी करतील. त्यानंतरच जीएसटी रजिस्ट्रेशन रद्द करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. त्यामुळे थकबाकी असलेल्या व्यापाऱ्यांना जुन्या प्रक्रियेनुसारच तपासणीला सामोरे जावे लागणार आहे.
छोट्या दुकानदारांनी ‘या’ फॉर्मकडे लक्ष द्यावे
कंपोझिशन स्कीमअंतर्गत जीएसटी नोंदणी केलेल्या छोट्या दुकानदारांनी रजिस्ट्रेशन रद्द करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अशा व्यापाऱ्यांनी GST CMP-08 हा फॉर्म पूर्णपणे भरलेला असल्याची खात्री करावी. हा फॉर्म अपूर्ण असल्यास अर्जाला थेट ऑनलाइन मंजुरी मिळण्यात अडचण येऊ शकते.
त्यामुळे जीएसटी नंबर रद्द करू इच्छिणाऱ्या व्यापाऱ्यांनी सर्व रिटर्न, कर आणि इतर थकबाकीची पूर्तता करूनच अर्ज करावा. नव्या बदलामुळे नियमांचे पालन करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांची जीएसटी नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
