भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून टोळक्याने केले तरुणावर कोयत्याने वार, पुण्यातील घटना

पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. आता भांडणामध्ये मध्यस्थी करुन ती सोडविल्याने टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करुन त्याला जबर जखमी केल्याचा प्रकार येरवड्यात घडला आहे.

याप्रकरणी अभिजित अप्पासाहेब दुशींग (रा. येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रतिक नाईकनवरे, चिकू नाईकनवरे, अभिषेक बडे, श्री पाटोळे, प्रियांशू वैरागर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी व आरोपी हे एकाच परिसरात राहतात. प्रतिक नाईकनवरे याची सागर हुले याच्यासोबत भांडणे झाली होती. ती फिर्यादी यांनी मध्यस्थी करुन सोडवली होती व प्रतिक याच्या कानाखाली मारली होती.

त्याचा राग मनात धरुन आरोपीने फिर्यादी यांच्या मुलास काही कारण नसताना कानाखाली मारली. त्याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी हे गेले होते. त्यावेळी मागील वेळच्या भांडणाचा राग मनात धरुन त्याने कोयत्याने फिर्यादीला मारहाण केली.
कोयता उगारुन मध्ये कोणी आला तर त्याला सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यामुळे लोकांनी आपल्या घराचे दरवाजे बंद केले. याबाबत सध्या पोलीस उपनिरीक्षक डोंबाळे तपास करीत आहेत.