दर्शन करून घराकडे निघाले, पण वाटेतच काळाने गाठलं! राजस्थानमध्ये धुळेकरांच्या क्रूझरचा भीषण अपघात, ९ जणांचा मृत्यू

धुळे : राजस्थानमधील खाटू श्यामजींचे दर्शन घेऊन आनंदाने घराकडे निघालेल्या धुळे जिल्ह्यातील भाविकांवर नियतीने घाला घातला. कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडली. महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला भाविकांची क्रूझर गाडी धडकल्याने नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर आठ जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये चिमुकल्यांचाही समावेश असल्याने या घटनेने परिसरासह धुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील तीन कुटुंबे वेगवेगळ्या वाहनांतून राजस्थानमधील प्रसिद्ध खाटू श्यामजींच्या दर्शनासाठी गेली होती. दर्शन घेतल्यानंतर सर्वजण महाराष्ट्राच्या दिशेने परतीच्या प्रवासाला लागले. मात्र, रविवारी मध्यरात्री सुमारे दोन वाजता त्यांच्यावर संकट कोसळले. राजस्थानमधील कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावरील शंभूपुरा गावाजवळ ही दुर्घटना घडली. नाता पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालकाचे क्रूझरवरील नियंत्रण सुटले आणि महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिली.

धडकेने गाडीचा पुढील भाग पूर्णपणे उद्ध्वस्त

अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की क्रूझरचा पुढील भाग पूर्णपणे चेपला गेला. वाहनातील प्रवासी गाडीत अडकले. मध्यरात्री झालेल्या मोठ्या आवाजामुळे परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. अपघाताचे विदारक दृश्य पाहून उपस्थित नागरिकही सुन्न झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून स्थानिकांच्या मदतीने अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले.

एकाच कुटुंबावर दुःखाचा डोंगर; आठ जण रुग्णालयात
या क्रूझरमध्ये एकूण १६ जण प्रवास करत होते. या दुर्घटनेत नऊ जणांचा जागीच जीव गेला असून, मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे मृतांपैकी बहुतांश जण एकाच कुटुंबातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. अन्य आठ प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने कोटा येथील मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
खाटू श्यामजींच्या दर्शनानंतर सुखरूप घरी परतण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाविकांचा प्रवास अशा प्रकारे संपल्याने धुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
