रोहित पवारांचं थेट सरकारलाच चँलेज, म्हणाले, आजच नार्को टेस्ट करा पण…, अजित पवारांच्या अपघात प्रकरणात पुन्हा मोठा दावा


मुंबई : अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, सातत्याने विविध आरोप केले जात आहेत. ‘मफलर मॅन’ कोण आहे, याबाबतही त्यांनी खुलासा केला. तसेच VSR कंपनीला देवेंद्र फडणवीस वाचवत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. फडणवीसांवर थेट आरोप झाल्याने भाजप नेत्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला. पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी फडणवीसांचा एक फोटोही दाखवला.

रोहित पवारांच्या आरोपांनंतर राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका नसून रोहित पवार यांची वैयक्तिक भूमिका असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट शेअर करत थेट सरकारलाच आव्हान दिले.

या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात VSR कंपनीला क्लीनचिट देण्याची घाई सुरू असल्याचा आरोप केला. ट्रोलर्सपासून आमदार आणि मंत्र्यांपर्यंत अनेकजण एकाच सुरात या कंपनीची पाठराखण करत असल्याचे त्यांनी म्हटले. एका कंपनीसाठी एवढा प्रयत्न करण्याऐवजी अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले असते, तर महाराष्ट्राला अभिमान वाटला असता, असेही त्यांनी नमूद केले.

सरकारी यंत्रणा एका कंपनीच्या बाजूने काम करत असल्याचा आरोप करत रोहित पवार यांनी VSR कंपनी आणि संबंधित व्यक्तींमधील संबंधांवरही प्रश्न उपस्थित केले. याशिवाय, एका मंत्र्याने आपली नार्को टेस्ट करण्याची मागणी केल्याचा उल्लेख त्यांनी पोस्टमध्ये केला.

यावर प्रत्युत्तर देताना रोहित पवार यांनी सरकारला आजच आपली नार्को टेस्ट करण्याचे खुले आव्हान दिले. मात्र, ही टेस्ट आपल्यासोबत संबंधित व्यक्तींचीही करण्यात यावी, अशी अट त्यांनी घातली. ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल,’ असे म्हणत सत्य समोर येण्यासाठी आपण तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता रोहित पवारांच्या या आव्हानावर सरकार आणि संबंधित नेते काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!