शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! वयाची ६० वर्षे पूर्ण होताच खात्यात येणार दरमहा ६ हजार रुपये; पती-पत्नी दोघांनाही मिळणार पेन्शन, असा करा अर्ज

पुणे : आयुष्यभर शेतात राबल्यानंतर वृद्धापकाळात आर्थिक आधार कोण देणार, हा प्रश्न अनेक शेतकरी कुटुंबांसमोर असतो. मात्र, आता अशा शेतकरी दाम्पत्यांसाठी केंद्र सरकारची एक योजना महत्त्वाची ठरू शकते. विशेष म्हणजे, पती आणि पत्नी दोघांनीही या योजनेत स्वतंत्रपणे सहभाग घेतला आणि पात्रतेच्या अटी पूर्ण केल्या, तर वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर कुटुंबाला मिळून दरमहा ६ हजार रुपये पेन्शन मिळू शकते. या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना.
नेमका किती मिळणार आर्थिक लाभ?

या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्याला वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा ३ हजार रुपये पेन्शन दिली जाते. म्हणजेच एका लाभार्थ्याला वर्षभरात ३६ हजार रुपये मिळतात. पती-पत्नी दोघेही स्वतंत्रपणे योजनेत सहभागी असल्यास दोघांना मिळून दरमहा ६ हजार रुपये आणि वर्षाला ७२ हजार रुपयांची पेन्शन मिळू शकते. वृद्धापकाळात औषधोपचार, घरखर्च आणि दैनंदिन गरजांसाठी ही रक्कम उपयोगी पडू शकते.

दरमहा किती रुपये भरावे लागतात?

या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याला स्वतःच्या वयानुसार दरमहा ५५ ते २०० रुपयांपर्यंत योगदान द्यावे लागते. विशेष म्हणजे, शेतकरी जेवढी रक्कम जमा करतो, तेवढाच आर्थिक वाटा केंद्र सरकारकडूनही जमा केला जातो. वयाच्या ६० वर्षांपर्यंत हे योगदान नियमित भरावे लागते. त्यानंतर मासिक पेन्शन सुरू होते.
कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा लाभ?
– अर्जदाराचे वय १८ ते ४० वर्षे असणे आवश्यक.
– शेतकरी अल्पभूधारक किंवा सीमांत शेतकरी असावा.
– स्वतःच्या नावावर जास्तीत जास्त दोन हेक्टर लागवडीयोग्य जमीन असावी.
– योजनेत सहभागी झाल्यानंतर नियमित मासिक योगदान भरणे आवश्यक.
– योजनेच्या इतर पात्रता अटींची पूर्तता करणे बंधनकारक.
नोंदणी कुठे आणि कशी करायची?
योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या सामायिक सेवा केंद्रात (सीएससी) जाऊन नोंदणी करता येते. यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक किंवा खात्याचा तपशील आणि जमिनीशी संबंधित आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत. आधार क्रमांकाच्या आधारे नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाते. शेतकऱ्याच्या प्रवेशाच्या वयानुसार मासिक हप्त्याची रक्कम निश्चित होते. ऑनलाइन पोर्टलवरूनही अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
त्यामुळे आज तरुण वयात असलेल्या पात्र शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होऊन भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी योगदान देता येणार आहे. मात्र, पती-पत्नी दोघांनी पेन्शन मिळवण्यासाठी स्वतंत्रपणे पात्र ठरून नोंदणी करणे आवश्यक आहे.
