महेंद्रसिंह धोनीची आयपीएलमधून निवृत्ती, CSK कडून लगेच नवी आणि मोठी जबाबदारी…

नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार आणि चाहत्यांचा लाडका खेळाडू महेंद्रसिंह धोनी याच्या आयपीएल कारकिर्दीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आगामी हंगामापूर्वी धोनीने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केल्याची माहिती समोर आली असून, त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने त्याच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. आता तो संघासाठी मेंटॉर म्हणून काम पाहणार असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या १८ वर्षांपासून आयपीएलमध्ये खेळणाऱ्या धोनीला मैदानावर पाहण्याची संधी चाहत्यांना पुन्हा मिळणार की नाही, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. धोनीच्या निवृत्तीच्या वृत्तामुळे चेन्नईच्या चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे.


गेल्या हंगामात धोनीला खेळण्याची संधी मिळाली नाही?

गेल्या हंगामात दुखापतीमुळे धोनी एकही सामना खेळू शकला नव्हता. त्याने संघासोबत प्रवासही केला नव्हता. त्यावेळी विकेटकीपिंगची जबाबदारी संजू सॅमसनने सांभाळली होती. त्यामुळे आगामी हंगामात चेन्नईचा संघ धोनीशिवाय मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे.

धोनीने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील शेवटचा सामना २५ मे २०२५ रोजी अहमदाबाद येथे गुजरात टायटन्सविरुद्ध खेळल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. मात्र, त्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. त्याआधी दिल्ली येथे राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने १६ धावा केल्या होत्या.
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने पटकावली पाच जेतेपदे
२००८ मध्ये आयपीएलला सुरुवात झाल्यापासून धोनी चेन्नई सुपर किंग्सचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. सीएसकेवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती, त्या काळात तो पुणे संघाकडून खेळला. मात्र, चेन्नई संघाचे पुनरागमन झाल्यानंतर धोनी पुन्हा आपल्या संघात परतला.
त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईने तब्बल पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर रवींद्र जडेजा आणि त्यानंतर ऋतुराज गायकवाड यांच्याकडे संघाची धुरा सोपवण्यात आली. मात्र, धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने मिळवलेले यश आजही विशेष मानले जाते.
धोनीची आयपीएलमधील कामगिरी
धोनीची आयपीएल कारकीर्द अत्यंत यशस्वी ठरली आहे. त्याने २७८ सामन्यांमध्ये ३८.३० च्या सरासरीने आणि १३७.४५ च्या स्ट्राइक रेटने ५,४३९ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर २४ अर्धशतके असून नाबाद ८४ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने आयपीएलमध्ये २६४ षटकारही ठोकले आहेत.
आयपीएल २०२७ पूर्वी खेळाडूंच्या अदलाबदलीला वेग
दरम्यान, आयपीएल २०२७ च्या मिनी ऑक्शनपूर्वी खेळाडूंच्या रिटेंशन आणि ट्रेडिंग प्रक्रियेत मोठे बदल पाहायला मिळत असल्याचे वृत्त आहे. ऋषभ पंतने लखनऊ सुपर जायंट्सची साथ सोडून दिल्ली कॅपिटल्समध्ये पुनरागमन केल्याचे सांगितले जात आहे. या व्यवहारात दिल्लीने फिरकीपटू कुलदीप यादवला लखनऊकडे पाठवले आहे.
या व्यवहारानुसार ऋषभ पंतची २७ कोटी रुपयांची जुनी डील कमी होऊन दिल्लीने त्याला १५ कोटी रुपयांमध्ये संघात घेतल्याचे वृत्त आहे. तर कुलदीप यादव १३.५ कोटी रुपयांच्या करारासह लखनऊच्या संघात दाखल झाल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्समध्ये मोठी अदलाबदल
मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातही मोठा खेळाडू बदल झाल्याची माहिती समोर आली आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स सोडून पंजाब किंग्समध्ये दाखल झाल्याचे, तर पंजाबचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह मुंबईच्या संघात आल्याचे वृत्त आहे.
या व्यवहारानुसार पंजाबने हार्दिक पांड्याला १८ कोटी रुपयांच्या करारासह संघात सामावून घेतल्याचे सांगितले जात आहे. तर अर्शदीप सिंहचा १८ कोटी रुपयांचा करार कायम ठेवण्यात आल्याची माहिती आहे. या बदलांमुळे आयपीएल २०२७ च्या हंगामापूर्वी संघांची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
