वर्षभरापूर्वी काळजाचा तुकडा गमावला, त्याच तारखेच्या उंबरठ्यावर घरात वर्षभरात पुन्हा चिमुकलीचं आगमन! डोंगराळे प्रकरणातील आई-वडिलांची कहाणी वाचून डोळे पाणावतील


मालेगाव : नाशिक जिल्ह्यातील डोंगराळे गावात एका वर्षापूर्वी घडलेल्या तीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी या चिमुरडीने अखेरचा श्वास घेतला. मात्र, या घटनेच्या वर्षपूर्तीच्या अगदी एक दिवस आधी, म्हणजेच १५ नोव्हेंबर २०२६ रोजी तिच्या आई-वडिलांच्या घरी पुन्हा कन्यारत्न जन्माला आले. या योगायोगाने कुटुंबातील दुःखाच्या आठवणींसोबत आनंदाचे अश्रूही तरळले. मालेगावमधील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चैतन्य सुकदेव देवरे यांनी या प्रसूतीचा अनुभव समाजमाध्यमांवर मांडला आहे.

डॉ. देवरे यांनी सांगितले की, ही प्रसूती त्यांच्यासाठी इतर प्रसूतींपेक्षा वेगळी आणि अत्यंत भावनिक होती. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी कुटुंबाची लाडकी ‘दीदी’ त्यांना सोडून गेली होती. त्यानंतर बरोबर वर्षभराने तिच्या आई-वडिलांच्या घरी पुन्हा मुलीचे आगमन झाले. त्यामुळे जणू देवाने पुन्हा लेकीलाच पाठवले, अशी भावना डॉक्टरांनी व्यक्त केली.

नवजात बाळाला पाहिल्यानंतर आई, आजी आणि आत्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. हा क्षण पाहून रुग्णालयातील डॉक्टरांसह संपूर्ण कर्मचारी वर्गही भावूक झाला. मागील नऊ महिन्यांचा प्रवास कुटुंबाच्या दुःखावर काही प्रमाणात फुंकर घालणारा ठरल्याचे डॉ. देवरे यांनी नमूद केले. काही प्रसूती खास असतात, तर काही अनुभव त्याही पलीकडे जातात, अशा शब्दांत त्यांनी या दिवसाचे महत्त्व सांगितले.

काय होते डोंगराळेतील ते हृदयद्रावक प्रकरण?

नोव्हेंबर २०२५ मध्ये मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. मुलीच्या वडिलांशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून विजय खैरनार याने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले होते. घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या तीन आठवड्यांत ४२५ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

जनभावना आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचे निर्देश दिले होते. सरकारची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. अखेर १६ ऑक्टोबर २०२६ रोजी दोषी विजय खैरनार याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.

एका बाजूला चिमुकलीच्या जाण्याची वेदनादायी आठवण आणि दुसरीकडे वर्षपूर्तीच्या आदल्या दिवशी घरात झालेल्या नव्या लेकीचे आगमन… या भावनिक प्रसंगाची माहिती डॉक्टरांनी शेअर केल्यानंतर त्यांची पोस्ट चर्चेत आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!