तटकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदेंचा ‘राजकीय भूकंप’! विश्वासू सहकाऱ्याची साथ सुटली, शेकडो कार्यकर्तेही बाहेर; दळवींच्या आरोपांनी रायगडमध्ये खळबळ, तटकरेंनीही दिलं प्रत्युत्तर!

रायगड : सुनील तटकरे यांची राजकीय ताकद मानल्या जाणाऱ्या माणगाव आणि श्रीवर्धनमध्येच राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने या दोन्ही भागांत पक्षप्रवेश घडवून आणत तटकरेंसमोर नवे आव्हान उभे केले आहे. माणगावमध्ये तटकरेंच्या विश्वासातील सहकाऱ्यासह अनेक कार्यकर्ते आणि काही माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर श्रीवर्धनमध्ये शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली. पालकमंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. त्यामुळे रायगडच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर महेंद्र दळवींनी सुनील तटकरे यांच्यावर थेट हल्लाबोल केला. राष्ट्रवादीच्या माध्यमातून जिल्ह्याला मिळालेल्या निधीपैकी ७० टक्के निधी चोरीला गेल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. २४ हजार कोटी आणि ७० हजार कोटी रुपयांच्या हिशोबाचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. तटकरे कुटुंबामुळे जिल्ह्याचे नुकसान झाले, तर कुटुंबाची मात्र भरभराट झाली, असा दावा दळवींनी केला. तटकरे यांच्यावर वैयक्तिक टीका करत त्यांनी दर्शन विचारे यांना दिलेल्या आश्वासनांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. श्रीवर्धनच्या विकासासाठी भरत गोगावले यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.


दळवींच्या या टीकेनंतर सुनील तटकरे यांनीही मौन सोडले. ‘बाप रे! त्यांना क्षमा करा. पांडुरंगाने त्यांना क्षमा करावी,’ अशा शब्दांत त्यांनी प्रत्युत्तर दिले. तटकरे कुटुंबाला विरोध असेल तर तो जरूर करावा; मात्र जनतेची सेवा अखंड सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. श्रीवर्धन हा राष्ट्रवादीचा अभेद्य बालेकिल्ला असून आजही आणि उद्याही तो एक हजार टक्के कायम राहील, असा ठाम दावाही त्यांनी केला. माझे काम बोलते, मतदारांना कोणी गृहीत धरू नये, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.

रायगडच्या विकासासाठी सातत्याने काम केले असून आरोप-प्रत्यारोपांपेक्षा जनतेचा विश्वास महत्त्वाचा असल्याचे तटकरे म्हणाले. महायुतीमध्ये मतभेद असले तरी विकासाच्या मुद्द्यावर एकत्र काम करण्याची भूमिका कायम असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, माणगाव आणि श्रीवर्धनमधील या पक्षप्रवेशांमुळे शिंदे गटाची ताकद वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, श्रीवर्धनवरील आपली पकड कायम असल्याचा दावा तटकरे यांनी केला आहे. त्यामुळे दोन बालेकिल्ल्यांतील या राजकीय घडामोडींचा आगामी काळात राष्ट्रवादीच्या ताकदीवर आणि रायगडमधील राजकीय समीकरणांवर नेमका काय परिणाम होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
