पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण साखळी अपघात! अचानक ब्रेक लागताच चार वाहने एकमेकांवर आदळली; प्रयागधाम फाट्यावर मोठं नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही!

उरुळी कांचन : पुणे-सोलापूर महामार्गावरील प्रयागधाम फाटा परिसरात चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. रविवारी (ता. 15) सकाळी पावणेबाराच्या सुमारास घडलेल्या या अपघातात चारही वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, चारही वाहने पुण्याच्या दिशेने जात होती. यावेळी पुढे असलेल्या वेरना कारचालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या बोलेरो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बोलेरोने व्हेरना कारला जोरदार धडक दिली. त्यानंतर बोलेरोच्या पाठीमागे असलेल्या मालवाहू कॅरी टेम्पोची बोलेरोला धडक बसली. या धडकेत टेम्पोची काच फुटून रस्त्यावर पडली.


टेम्पोच्या पाठीमागून येणारी हायरायडर कारही टेम्पोवर आदळली. त्यामुळे टेम्पो आणि हायरायडर कारचे मोठे नुकसान झाले. अशा प्रकारे एकापाठोपाठ चार वाहने एकमेकांवर आदळल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अपघाताची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस हवालदार सुदर्शन माने, कमलेश होले आणि इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने वाहने बाजूला करून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान, मागील दोन दिवसांपासून पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेषतः विश्वा पेट्रोल पंप परिसर आणि प्रयागधाम फाटा परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.

महामार्गावरील वाढती वाहनांची संख्या आणि त्या तुलनेत उरुळी कांचन पोलीस ठाण्याकडील अपुरे ट्रॅफिक कर्मचारी यामुळे वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. परिणामी, वाहनचालक व नागरिकांना तासनतास कोंडीत अडकावे लागत असून, प्रशासनाने तातडीने योग्य नियोजन करून या परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
