अमित शहांच्या पुणे दौऱ्यात भाजपच्या कार्यक्रमाला बगल, जिल्हा परिषदेत अजितदादांच्या पुतळ्याचं अनावरण कार्यक्रमास हजेरी; चर्चांना उधाण..


पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या १५ आणि १६ नोव्हेंबरच्या पुणे दौऱ्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या दोन दिवसांच्या दौऱ्यात भाजपच्या एका महत्त्वाच्या कार्यक्रमाला शाह उपस्थित राहणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. दुसरीकडे, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू असतानाच हा दौरा होत असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या आवारात अजित पवार यांच्या पुतळ्याचं अनावरण अमित शाह यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व असल्याने या कार्यक्रमाच्या माध्यमातून पक्षाकडून मोठं शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरू आहे. कार्यक्रमाची तयारी कितपत झाली आहे, याची पाहणी करण्यासाठी खासदार पार्थ पवार यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेला भेट दिली. त्यांनी कार्यक्रमस्थळाची पाहणी करून पूर्वतयारीचा आढावा घेतला.

भाजपच्या मॅरेथॉनला अमित शाहांची अनुपस्थिती

या दौऱ्यात भाजपच्या गोटात मात्र काहीशी निराशा असल्याची चर्चा आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेच्या उद्घाटनाला अमित शाह उपस्थित राहणार नाहीत. सुरुवातीला शाह या कार्यक्रमाला येणार असल्याचं सांगितलं जात होतं. त्यानुसार शहरात ठिकठिकाणी जाहिरात फलकही लावण्यात आले होते. मात्र, शाह रविवारी दुपारी पुण्यात दाखल होणार असल्याने मॅरेथॉनच्या उद्घाटनाला त्यांची उपस्थिती शक्य नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे.

विशेष म्हणजे, पुणे शहरात शाह यांचा अन्य कोणताही मोठा जाहीर कार्यक्रम नियोजित करण्यात आलेला नाही. रविवारी सायंकाळपासून सोमवार सकाळपर्यंत त्यांचं वेळापत्रक सार्वजनिक कार्यक्रमांपासून मोकळं ठेवण्यात आलं आहे.

बंद दाराआड नेमकी कोणती चर्चा होणार?

या राखीव वेळेत महायुतीतील वरिष्ठ नेत्यांसोबत शाह यांची महत्त्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणावरून सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आलं आहे. अजित पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरणाला शाह यांची उपस्थिती आणि भाजपच्या मॅरेथॉनपासून त्यांची अनुपस्थिती यामुळे राजकीय चर्चांना आणखी हवा मिळाली आहे.

मात्र, या दौऱ्यात बंद दाराआड नेमके कोणते विषय चर्चिले जाणार आणि राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत काही ठोस भूमिका समोर येणार का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यातील राजकीय घडामोडींकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!