राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय लवकरच? सुनेत्रा पवारांची फडणवीसांसोबत पावणे दोन तास चर्चा; राजकीय हालचालींना वेग

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या दोघांमध्ये तब्बल पावणे दोन तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत सुरुवातीला ऊर्जा विभाग आणि महाजेनकोशी संबंधित विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरही चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.


दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या गटातील 22 ते 26 आमदार शरद पवार गटातील नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदारांच्या भूमिकेचा आढावा घेतल्याची माहिती आहे. तसेच विलीनीकरणाला विरोध नसल्याची भूमिका बैठकीत मांडण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून पक्षातील नेत्यांमध्ये वेगवेगळी वक्तव्ये सुरू आहेत. सुनील तटकरे यांनी अजित पवार विलीनीकरणासाठी इच्छुक असल्याचा दावा केला होता. तसेच विलीनीकरणाची तारीख निश्चित झाल्याचेही त्यांनी म्हटले होते. यावर सुनेत्रा पवार यांनी योग्य वेळ आल्यावर विलीनीकरणाबाबत माहिती दिली जाईल, असे स्पष्ट केले.

मात्र, शरद पवार गटाची भूमिका वेगळी आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाची चर्चा एकतर्फी सुरू असल्याचे म्हटले आहे. अजित पवार यांनी पक्ष सोडला, त्याच दिवशी आमच्यासाठी विलीनीकरणाचा विषय संपला, असेही त्यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत नेमका काय निर्णय होणार, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
