आधी ‘आईशी बोलू नकोस’ म्हणत दिली होती ताकीद; पण प्रियकर ऐकेना, अखेर भरचौकात रक्ताचा थरार! अहिल्यानगरमध्ये मुलाने नेमकं काय केलं?


अहिल्यानगर : आईच्या प्रेमसंबंधांची माहिती मुलाला समजली आणि त्याने संबंधित व्यक्तीला आईपासून दूर राहण्याचा इशारा दिला. वारंवार समज देऊनही दोघांमधील संबंध सुरूच असल्याने मुलाच्या मनात संताप वाढत गेला. याच वादातून अखेर सोनईच्या भरवस्तीत रक्तरंजित घटना घडली. महिलेच्या मुलाने साथीदाराच्या मदतीने ४० वर्षीय रावसाहेब मच्छिंद्र पंडित यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी घडलेल्या या घटनेने नेवासा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

रावसाहेब पंडित हे मालवाहतूक वाहन चालवत होते. या कामासोबत ते शेतमजुरांची ने-आणही करत असत. याच दरम्यान त्यांची सोनईतील एका महिलेशी ओळख झाली. पुढे या ओळखीचे प्रेमसंबंधांत रूपांतर झाल्याची माहिती समोर आली. मात्र, या संबंधांची कुणकुण महिलेच्या मुलाला लागली. त्यानंतर त्याने रावसाहेब यांना आईशी बोलू नये आणि हे संबंध थांबवावेत, अशी समज दिली होती. तरीही संपर्क सुरू असल्याने त्यांच्यातील वाद वाढत गेल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

भरचौकात दुचाकीवरून आले अन् हल्ला केला

शुक्रवारी, १३ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ११.४० वाजता रावसाहेब सोनई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शिंगणापूर कमानीजवळ आपल्या वाहनाशेजारी उभे होते. त्याचवेळी महिलेचा मुलगा एका साथीदारासह दुचाकीवरून तेथे पोहोचला. दोघांनी अचानक रावसाहेब यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. भरवस्तीत घडलेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. गंभीर जखमी अवस्थेत रावसाहेब घटनास्थळी कोसळले, तर हल्लेखोर तेथून पसार झाले.

उपचारासाठी हलवले, पण जीव वाचू शकला नाही

घटनेची माहिती मिळताच रावसाहेब यांचे चुलतभाऊ कैलास मंजाबापू पंडित यांनी त्यांना तातडीने सोनई येथील रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

मुख्य आरोपी ताब्यात, दुसऱ्याचा शोध सुरू

रावसाहेब यांचे लहान भाऊ दीपक पंडित (वय ३६) यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मुख्य आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. आईच्या प्रेमसंबंधांवरून सुरू झालेला वाद या हत्येपर्यंत कसा पोहोचला, याचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!