पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलला FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; परवाने थेट निलंबित, कारण काय?

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली आणि रूपाली हॉटेलबाबत मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) या दोन्ही प्रसिद्ध हॉटेल्सवर कठोर कारवाई केली आहे. अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन्ही हॉटेल्सचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत. FDA आयुक्त IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

तपासणीत आढळल्या गंभीर त्रुटी
अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत वैशाली आणि रूपाली हॉटेलमधील स्वच्छतेबाबत अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. स्वयंपाकघरातील अस्वच्छता, उघड्यावर अन्नपदार्थांची साठवणूक आणि अन्नसुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले. वैशाली हॉटेलला तपासणीत 98 पैकी केवळ 58 गुण मिळाले. यापूर्वी नोटीस देऊनही परिस्थितीत सुधारणा झाली नसल्याने प्रशासनाने कठोर पाऊल उचलले.

स्वच्छतागृहाजवळ अन्नपदार्थांची तयारी!

तपासणीदरम्यान काही धक्कादायक बाबी समोर आल्या. अन्न तयार करण्याची प्रक्रिया स्वच्छतागृहांच्या जवळ सुरू असल्याचे आढळले. कच्चा माल ठेवण्यासाठीचा फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाजवळ होता. तर डोसा आणि उत्तप्पा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ ठेवण्यात आला होता. धुतलेली भांडीदेखील स्वच्छतागृहासमोरील टेबलावर ठेवलेली आढळली.
इतकेच नव्हे, तर उकडलेले बटाटे, शिजवलेला भात आणि इतर तयार अन्नपदार्थ उघड्या कॉरिडॉरमध्ये ठेवण्यात येत होते. इडली आणि डोशाचे पीठ तयार करण्याची प्रक्रियादेखील असुरक्षित जागेत सुरू असल्याचे तपासणीत उघड झाले.
नोटीस देऊनही सुधारणा नाही; अखेर परवाने निलंबित
वैशाली आणि रूपाली या दोन्ही हॉटेल्सना यापूर्वी प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यात सुधारणा झाली नाही. त्यामुळे FDA ने दोन्ही हॉटेल्सचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहेत.
परवाने पूर्ववत होईपर्यंत या हॉटेल्समधील अन्नपदार्थांची विक्री, पार्सल आणि होम डिलिव्हरीवर बंदी असणार आहे. पुण्यातील एफसी रोडवरील ही दोन्ही लोकप्रिय हॉटेल्स असल्याने या कारवाईची शहरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्सविरोधात FDA ने कारवाईचा बडगा उगारला आहे.
