कदमवाकवस्तीत मध्यरात्री तरुणाचा राडा! अल्टो कारच्या काचा फोडल्या, जीवे मारण्याची धमकी..

लोणी काळभोर : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील गुजर वस्ती, कवडीपाट परिसरात मध्यरात्री एका तरुणाने विनाकारण शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आणि अल्टो कारच्या काचा फोडून वाहनाचे नुकसान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

याबाबत समाधान साळवे (रा. गुजर वस्ती, कवडीपाट, कदमवाकवस्ती) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश छबन लोंढे (वय २८) याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि संबंधित तरुण एकमेकांच्या परिचयाचे असून एकाच परिसरात राहतात. बुधवारी रात्री फिर्यादी घरी असताना संबंधित तरुणाने कोणतेही कारण नसताना त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

तसेच संबंधित तरुणाने एमएच १२ जीएन ३४२६ क्रमांकाच्या अल्टो के-१० कारच्या काचा फोडून वाहनाचे नुकसान केले. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

