अजितदादांच्या शेवटच्या प्रवासाचा निर्णय कोणी बदलला? देवगिरीच्या CCTV फुटेजवरून मिटकरींचा स्फोटक दावा; फडणवीसांना थेट सवाल, CBI चौकशीसाठी आक्रमक पवित्रा!

अकोला : अजित पवार यांच्या विमान अपघातामागचे गूढ नेमके काय, हा प्रश्न पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी देवगिरी निवासस्थानावरील सीसीटीव्ही फुटेजचा मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अपघाताला नऊ महिन्यांहून अधिक काळ उलटूनही या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी का होत नाही? असा सवाल करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

म्हैसपूर येथील आपल्या शेतात आयोजित करण्यात आलेल्या ‘बळी महोत्सवा’त शेतकऱ्यांसमोर बोलताना मिटकरी यांनी ही आक्रमक भूमिका मांडली. अजित पवार यांच्या मृत्यूशी संबंधित महत्त्वाचे पुरावे असू शकणारे देवगिरी निवासस्थानावरील सीसीटीव्ही फुटेज शोधण्यात सरकार अपयशी ठरत असेल, तर असे सरकार निरुपयोगी असल्याची टीका त्यांनी केली. अजितदादांचे मित्र म्हणवून घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात सीबीआय चौकशीसाठी पुढाकार का घेतला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
रस्तेमार्गाचा निर्णय बदलून विमान प्रवासाचा सल्ला कोणी दिला?

मिटकरी यांनी अजित पवार यांच्या शेवटच्या प्रवासातील काही निर्णयांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. प्रवासाच्या आदल्या दिवशी रस्तेमार्गे जाण्याचे निश्चित झाले होते, तर ऐनवेळी हा निर्णय बदलण्यामागे कोण होते? विमानाने जाण्याचा सल्ला कोणी दिला? विमानाचे पायलट आणि क्रू मेंबर्स बदलण्याचा निर्णय कोणी घेतला? या घटनाक्रमाची उत्तरे अद्याप मिळालेली नसल्याचे त्यांनी म्हटले. अजित पवार यांचा मृत्यू हा अपघात नसून घातपात असल्याचा संशयही त्यांनी पुन्हा व्यक्त केला.

‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल’ चित्रपटासाठी पुरावे दिल्याचा दावा
या भाषणात मिटकरी यांनी आगामी ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल’ चित्रपटाचाही उल्लेख केला. चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अजित पवार यांच्या मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर अघोरी पूजा करणाऱ्यांसंदर्भातील काही पुरावे दिल्याचा दावा त्यांनी केला. तसेच खरातच्या आश्रमात स्वतःच्या करंगळ्या कापणारे लोक नेमके कोण होते, याचा शोध घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रवादीनेही सीबीआय चौकशीची मागणी केली
दरम्यान, ४ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य समितीच्या बैठकीतही अजित पवार यांच्या अपघाताच्या तपासाचा मुद्दा उपस्थित झाला होता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सीआयडी तपासाला गती देण्याची आणि सीबीआय चौकशीची मागणी पुन्हा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
या प्रकरणात महाराष्ट्र सीआयडीकडून कटकारस्थान, घातपात किंवा निष्काळजीपणाची शक्यता तपासली जात आहे. यापूर्वी तपास सीबीआयकडे देण्याबाबत राज्य सरकारनेही हालचाली सुरू केल्याची माहिती समोर आली होती.
आता मिटकरी यांनी उपस्थित केलेले देवगिरीचे सीसीटीव्ही फुटेज, विमान प्रवासाचा बदललेला निर्णय आणि कर्मचाऱ्यांमधील बदल यांसारखे प्रश्न पुन्हा चर्चेत आले आहेत. या प्रश्नांवर मुख्यमंत्री फडणवीस आणि तपास यंत्रणा काय स्पष्टीकरण देणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
