दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुनेत्रा पवारांच्या सूचक विधानाने राजकीय चर्चांना उधाण

पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाची चर्चा जोर धरत आहे. दोन्ही गटांतील नेत्यांच्या भेटीगाठी आणि नेत्यांकडून करण्यात येणाऱ्या विधानांमुळे या चर्चांना अधिकच वेग आला आहे.

अजित पवार गटातील काही नेत्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच पार्थ पवार यांनी सलग दोन दिवस शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने चर्चांना आणखी उधाण आले. या भेटी प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यामागे राजकीय समीकरणांची चर्चा असल्याचेही बोलले जात होते.
सुनेत्रा पवार नेमकं काय म्हणाल्या?

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना मुंबईतील पत्रकार परिषदेत दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, ‘जशी वेळ येईल, तशा गोष्टी कळतील,’ असे सूचक उत्तर दिले.

सुनेत्रा पवार यांनी या विधानातून विलीनीकरणाबाबत कोणताही स्पष्ट होकार किंवा नकार दिलेला नाही. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येणार का, याबाबतची उत्सुकता कायम आहे.
विलीनीकरणाच्या चर्चांना कशी मिळाली गती?
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी शरद पवार यांची ब्रीच कँडी रुग्णालयात भेट घेतली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही अजित पवार यांना विलीनीकरणाबाबत कल्पना असल्याचे सांगितले होते. अजित पवार हयात असते, तर फेब्रुवारी महिन्यातच विलीनीकरण झाले असते, असे वक्तव्यही त्यांनी केले होते.
या सर्व घडामोडींमुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य एकत्रीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. आता सुनेत्रा पवार यांच्या सूचक विधानानंतर या राजकीय चर्चांना आणखी हवा मिळाली असून, आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
