लेकीच्या शरीरावरील खुणांनी आईला आला संशय; सावत्र बापाचं कृत्य CCTV मध्ये कैद, नागपुरातील घटना


नागपूर : मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घरातही मुली सुरक्षित नसल्याची धक्कादायक घटना नागपुरातून समोर आली आहे. एका १० वर्षीय मुलीचे तिच्याच सावत्र वडिलांकडून वारंवार लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप आहे. मुलीच्या शरीरावर संशयास्पद खुणा आढळल्यानंतर आईला संशय आला. त्यानंतर आईने CCTV कॅमेऱ्याच्या मदतीने हा प्रकार उघडकीस आणल्याची माहिती समोर आली आहे.

नागपूरच्या पाचपावली परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी ४५ वर्षीय सावत्र वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मुलीच्या शरीरावरील खुणांमुळे आईला आला संशय

मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या शरीरावर संशयास्पद खुणा दिसल्यानंतर आईला पतीच्या वागण्यावर संशय आला. त्यामुळे त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आईने घरात गुपचूप CCTV कॅमेरा बसवला. जवळपास वर्षभर घरातील हालचालींचे रेकॉर्डिंग करण्यात आले होते. तसेच मैत्रिणीच्या मोबाईलवरून लाईव्ह फुटेज पाहण्याची व्यवस्था केली होती.

CCTV फुटेजमधून प्रकार उघडकीस

आईने दिलेल्या माहितीनुसार, CCTV फुटेजमधून सावत्र वडिलांकडून मुलीचे लैंगिक शोषण होत असल्याचा प्रकार समोर आला. यानंतर आईने मुलीकडे विचारणा केली असता तिनेही आपल्यासोबत वारंवार गैरवर्तन झाल्याचे सांगितले. कोणाला काही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्यामुळे मुलगी गप्प होती, अशी माहिती समोर आली आहे.

पोलिसांकडून आरोपीला अटक

आईने दिलेल्या तक्रारीनंतर पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. लैंगिक अत्याचार आणि धमकीसह पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून आरोपीची चौकशी सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!