पाणी मागितलं अन् अमानुषतेचा कळस गाठला! तरुणाला चौकाचौकात फिरवून मारहाण, तोंडावर लघवी केल्याचा आरोप; वैजापुरातील घटनेने महाराष्ट्र हादरला

छत्रपती संभाजीनगर : जुन्या वादातून सुरू झालेल्या वादाचा शेवट एका तरुणाच्या मृत्यूत झाल्याने वैजापूरमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रोहित पठारे या तरुणाला वेगवेगळ्या चौकांत नेऊन बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. मारहाणीदरम्यान त्याने पाणी मागितले असता आरोपींनी त्याच्या तोंडावर लघवी केल्याचा संतापजनक दावाही कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

या घटनेनंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी रोहित पठारेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी कुटुंबीयांनी अश्रू अनावर होत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. आरोपींना मदत करण्यात आली, तसेच तक्रार दाखल करून घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
कुटुंबीयांच्या तक्रारीची दखल घेत संजय शिरसाट यांनी तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवला आहे. या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पाच पथके रवाना करण्यात आली आहेत. पीडित कुटुंबाला सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून पाच लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्याची घोषणाही त्यांनी केली. आरोपींना कठोर शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन शिरसाट यांनी दिले.

दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील कळंबमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या अपहरणाचा थरार घडला. कळंब तालुक्यातील बोर्डा गावात एका तरुणाने आपल्या चार साथीदारांसह तरुणीच्या घरी धडक दिली. तिच्या आई आणि बहिणीला तलवार दाखवून त्याने तरुणीला जबरदस्तीने घरातून बाहेर काढले आणि एर्टिगा गाडीत बसवून पळवून नेले. भरधाव गाडीच्या धडकेत दोघे गंभीर जखमी झाले.

पोलिसांनी पाठलाग करत अंबाजोगाई परिसरात गाडी अडवली. मात्र, आरोपीने हातातील कोयता दाखवत तरुणीला धमकावण्यास सुरुवात केली. ‘एक तर तिला संपवतो किंवा मी तरी संपतो,’ अशी धमकी देत त्याने पोलिसांसमोर जवळपास अर्धा तास दहशत निर्माण केली. अखेर पोलिसांनी जीवाची बाजी लावत त्याला पकडले. या झटापटीत कोयत्याने एका पोलीस कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणातील एक आरोपी ताब्यात असून अन्य तीन जण फरार आहेत. पोलीस कर्मचारी हनुमंत गायकवाड यांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक होत असून, अपहरणाच्या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला आहे.
वैजापूरमधील तरुणाच्या हत्येतील अमानुष आरोप आणि कळंबमधील अपहरणाचा थरार या दोन घटनांमुळे मराठवाड्यात खळबळ उडाली आहे.
