कचरा वेचताना रक्ताने माखलेलं पोतं दिसलं; उघडताच दोघांच्या पायाखालची जमीन सरकली! आत पुरुषाचे दोन पाय, पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ


पिंपरी-चिंचवड : रस्त्याच्या कडेला पडलेलं एक पोतं… त्यावर दिसणारे रक्ताचे डाग आणि ते उघडताच समोर आलेलं भयंकर दृश्य! पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव परिसरात शुक्रवारी (६ नोव्हेंबर) सकाळी घडलेल्या या घटनेने नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकवला. कचरा गोळा करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांना पोत्यात पुरुषाचे गुडघ्याखालून वेगळे केलेले दोन पाय आढळले. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा लोट आणि ओमकार काळे हे दोघे शुक्रवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पिंपळे गुरव परिसरात कचरा गोळा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला पडलेल्या एका पोत्यावर त्यांची नजर पडली. पोत्यावर रक्ताचे डाग असल्याने दोघांना संशय आला. सुरुवातीला त्यामध्ये एखाद्या श्वानाचे पाय असावेत, असे त्यांना वाटले. मात्र, पोते उघडून पाहताच आत मानवी पाय असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हे दृश्य पाहून दोघांनाही मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत तपास सुरू केला आहे. गुन्हे शाखेचे पथकही घटनास्थळी पोहोचले असून या मानवी अवयवांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

शरीराचे उर्वरित अवयव कुठे? पोलिसांसमोर गंभीर प्रश्न!

सापडलेले पाय नेमके कोणत्या व्यक्तीचे आहेत? त्या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे का? शरीराचे इतर अवयव कुठे आहेत? गुडघ्यापासून पाय वेगळे करून पोत्यात भरून रस्त्याच्या कडेला कोणी टाकले? असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाले आहेत. हत्या करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला असण्याची शक्यता नाकारता येत नसली, तरी याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस उपायुक्त संदीप आटोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त मनीषा कदम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मानवी अवयवांची ओळख पटवणे आणि या घटनेमागील नेमके कारण शोधणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. भरवस्तीतील परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली असून तपासातून या रहस्यमय घटनेचा उलगडा कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!