गोकुळच्या सत्तेसाठी फडणवीस ठाम, शिंदेंची मात्र वेगळीच भूमिका! उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना फोन; महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या संघर्षाची ठिणगी


कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या सत्तेवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी राज्य सरकारने पाच शासननियुक्त संचालक नेमण्याचा निर्णय घेतल्याने सत्तासमीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे विरोधक आक्रमक झाले असून महायुतीमधील मतभेदही उघडपणे समोर येऊ लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या निर्णयावर ठाम असल्याची माहिती आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मात्र वेगळी भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. याचदरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सतेज पाटील यांना फोन करून या संघर्षात पाठिंबा जाहीर केला आहे.

गोकुळच्या निवडणुकीत नेमकं काय घडलं?

गोकुळच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने १३ जागा जिंकल्या, तर महायुतीच्या पॅनेलला १२ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे २५ सदस्यांच्या संचालक मंडळात सतेज पाटील यांच्या आघाडीला निसटते बहुमत मिळाले. परिणामी अध्यक्षपदाच्या निवडीत त्यांची बाजू मजबूत मानली जात होती.

मात्र, राज्य सरकारने गोकुळमध्ये पाच शासननियुक्त संचालक नेमण्याचा निर्णय घेतला. यामध्ये चार राजकीय आणि एका शासकीय संचालकाचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. या संचालकांना मतदानाचा अधिकारही असणार आहे. त्यामुळे निवडून आलेल्या संचालकांच्या संख्याबळाचे गणित बदलू शकते. सतेज पाटील यांच्या आघाडीकडे असलेले बहुमत या नियुक्त्यांमुळे धोक्यात येण्याची शक्यता आहे.

फडणवीस निर्णयावर ठाम; न्यायालयात बाजू मांडणार

या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाम असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. गोकुळमध्ये कोरम पूर्ण होत नसल्यास निवडणूक रद्द होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. कोरम पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासननियुक्त संचालकांचा निर्णय घेण्यात आल्याचे फडणवीस यांची भूमिका असल्याचे सांगितले जाते. या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले गेले, तर सरकार आपली बाजू मांडेल, असेही त्यांनी स्पष्ट केल्याची माहिती आहे.

शिंदे गटाची नाराजी; महायुतीत मतभेद उघड

या संपूर्ण प्रकरणात सर्वाधिक लक्ष वेधले जात आहे ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या भूमिकेने. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेशी शिंदे गट सहमत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गोकुळच्या निवडणुकीत मतदारांनी निवडून दिलेल्या संचालकांचा कौल मान्य केला पाहिजे, अशी शिवसेनेची भूमिका असल्याचे समजते. त्यामुळे सरकारच्या निर्णयावर महायुतीतील घटक पक्षांमध्ये एकमत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना फोन

दुसरीकडे, सरकारच्या निर्णयाविरोधात सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आक्रमक भूमिका मांडली. गोकुळवरील निर्णय हा कोल्हापूरकरांचा अपमान असल्याचे सांगत त्यांनी ९ नोव्हेंबर रोजी संघर्ष मोर्चा काढण्याची घोषणा केली. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या संचालकांचे अधिकार डावलले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सतेज पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. गोकुळच्या लढाईत ठाकरे गट तुमच्या पाठीशी आहे. लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे सांगण्यात आले.

एकीकडे फडणवीस सरकारचा निर्णय, दुसरीकडे शिंदे गटाची नाराजी आणि आता उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना पाठिंबा, यामुळे गोकुळचा संघर्ष केवळ कोल्हापूरपुरता मर्यादित राहिलेला नाही. ९ नोव्हेंबरच्या मोर्चातून विरोधक कोणती भूमिका मांडतात आणि शासननियुक्त संचालकांच्या मुद्द्यावर न्यायालयात काय घडते, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!