उपचार सुरू असतानाच सहाव्या मजल्याच्या खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न; परिचारिकांनी रोखण्याचा प्रयत्न केला, पण काही क्षणांत अनर्थ! बारामतीत ४६ वर्षीय रुग्णाचा मृत्यू

बारामती : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात गुरुवारी दुपारी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने खळबळ उडाली आहे. उपचारासाठी दाखल असलेल्या ४६ वर्षीय रुग्णाचा रुग्णालयाच्या सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. खिडकीतून बाहेर जाण्याच्या प्रयत्नात तोल गेल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर रुग्णालयातील सुरक्षेच्या व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

रणजीत दत्तात्रय शितोळे (वय ४६, रा. बेलवाडी, ता. इंदापूर) असे मृत रुग्णाचे नाव आहे. ४ नोव्हेंबर रोजी रक्ताच्या उलट्या आणि फेफरे आल्याने त्यांना बारामतीतील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वॉर्ड क्रमांक ५८ मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टरांच्या पथकासह मानसोपचारतज्ज्ञ आणि कान-नाक-घसा विभागातील तज्ज्ञही त्यांच्या उपचारात सहभागी होते.
दुपारी सव्वाचारच्या सुमारास घडली दुर्घटना

गुरुवारी (५ नोव्हेंबर) दुपारी सव्वाचारच्या सुमारास शितोळे यांनी वॉर्डच्या पॅसेजमधील खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्यांची हालचाल लक्षात येताच परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवण्यासाठी धाव घेतली. मात्र, त्यांचा तोल सुटला आणि ते सहाव्या मजल्यावरून थेट दुसऱ्या मजल्यावरील टेरेसवर कोसळले. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना तातडीने अपघात विभागात हलवण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

नातेवाईक निघून गेल्याचा प्रशासनाचा दावा
रुग्णाची मानसिक स्थिती अस्थिर असल्याची माहिती नातेवाईकांना देण्यात आली होती. तसेच रुग्णासोबत थांबण्याच्या सूचनाही करण्यात आल्या होत्या. मात्र, नातेवाईक रुग्णाला रुग्णालयात सोडून निघून गेल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या दाव्यामुळे घटनेच्या वेळी रुग्णासोबत कोणी उपस्थित होते का, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
खिडक्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
सहाव्या मजल्यावरील खिडक्यांना पुरेशी संरक्षक जाळी किंवा इतर सुरक्षा व्यवस्था होती का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. रुग्णालयासारख्या ठिकाणी अस्वस्थ अवस्थेतील रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी कोणती खबरदारी घेतली जाते, याकडेही लक्ष वेधले जात आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वैद्यकीय-कायदेशीर प्रकरणाची नोंद केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून रुग्णालयातील सीसीटीव्ही चित्रण तपासले जात आहे. संबंधित कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्याचे कामही सुरू आहे. बारामती पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून दुर्घटनेमागील नेमकी परिस्थिती आणि सुरक्षेतील संभाव्य त्रुटी तपासातून स्पष्ट होणार आहेत.
