शिवरायांच्या इतिहासावरून पडळकरांची भरसभेतच कोंडी! अफजलखानाचा उल्लेख करताच जयंत पाटलांनी पकडली मोठी चूक; प्रत्युत्तराने राजकीय वातावरण तापलं!


सांगली : सांगलीच्या राजकीय मैदानात एकमेकांना आव्हान देणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरून आमनेसामने आले आहेत. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अवघ्या २० मतांनी विजय मिळवल्यानंतर पडळकरांनी जयंत पाटलांना डिवचण्याची संधी सोडली नाही. मात्र, बावची येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यात पडळकरांच्या एका विधानामुळे त्यांची चांगलीच कोंडी झाली.

अफजलखानाचा कोथळा नेमका कुठे काढला?

कार्यक्रमात बोलताना गोपीचंद पडळकर यांनी अफजलखानाचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगडाच्या पायथ्याशी काढल्याचा उल्लेख केला. पडळकरांचे हे विधान ऐकताच जयंत पाटील यांनी त्यांना इतिहासातील संदर्भाची आठवण करून दिली. अफजलखानाचा कोथळा पन्हाळगडाच्या पायथ्याशी नव्हे, तर प्रतापगडाच्या पायथ्याशी काढण्यात आला होता, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

यावरच न थांबता, पुढच्या वेळी थोडा चांगला अभ्यास करून या, असा टोला त्यांनी लगावला. पाठ केलेले भाषण केल्यावर अशा चुका होतात, असे म्हणत जयंत पाटलांनी पडळकरांना चिमटाही काढला. एकाच व्यासपीठावर घडलेल्या या प्रसंगामुळे उपस्थितांचे लक्ष वेधले गेले.

पडळकरांचा पलटवार; जयंत पाटलांना दिला थेट इशारा?

जयंत पाटलांच्या टीकेनंतर पडळकरांनीही आक्रमक भाषेत उत्तर दिले. शत्रू कितीही मोठा असला तरी त्याला घाबरायचे नसते, तर थेट त्याच्या गोटात जाऊन सामना करायचा असतो, अशा शब्दांत त्यांनी पाटलांना लक्ष्य केले. प्रत्येकाच्या आयुष्यात राजकीय किंवा आर्थिक अडचणींचा वेढा निर्माण होतो; मात्र अशा वेढ्यातून बाहेर पडण्याची कला छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकायला हवी, असेही ते म्हणाले.

शाहिस्तेखानाच्या प्रसंगाचा संदर्भ देताना पडळकरांनी शत्रूच्या घरात घुसून त्याला धडा शिकवण्याचा उल्लेख केला. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.

दरम्यान, सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पडळकर आणि जयंत पाटील यांच्यात प्रतिष्ठेची लढत झाली होती. या निवडणुकीत पडळकरांनी २० मतांनी विजय मिळवला. त्यानंतर आता बावची येथील स्मारक सोहळ्यातील या टोलेबाजीमुळे सांगलीच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!