आधी समज दिली, तरी पाठलाग थांबेना; अखेर तरुणाला एकट्यात गाठून संपवलं! तुळजापुरातील हत्येने खळबळ, माजी नगराध्यक्षासह दोघे अटकेत

धाराशिव : मुलीचा वारंवार पाठलाग करून तिला त्रास दिल्याच्या आरोपातून धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरमध्ये एका १८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. समीर जब्बार पटेल असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणात माजी नगराध्यक्ष संतोष देविदास कदम ऊर्फ परमेश्वर आणि संजय विलास जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर अन्य चार संशयितांचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे, संबंधित तरुणाला यापूर्वीही समज देण्यात आली होती. मात्र, पुन्हा तोच प्रकार घडल्याने वाद टोकाला गेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

परीक्षा देऊन घरी परतला, पण वाटेतच घात
समीर हा तुळजाभवानी महाविद्यालयात बी.कॉमच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. ३ नोव्हेंबर रोजी परीक्षा दिल्यानंतर तो घरी परतत होता. याचदरम्यान काही जण त्याला सोबत घेऊन गेले. त्यानंतर त्याला एकांतात नेऊन बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या मारहाणीत समीर गंभीर जखमी झाला.

भारतीयबुवा मठाजवळील पार्किंग परिसरात तो जखमी अवस्थेत आढळून आला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेत समीरचा नातेवाईक अरबाज अफसर सय्यद हाही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुलीच्या पाठलागावरून आधीच दिली होती समज
या प्रकरणाच्या तपासात समीर एका मुलीचा वारंवार पाठलाग करून तिला त्रास देत असल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात यापूर्वी त्याला समज देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, त्यानंतरही संबंधित प्रकार सुरू असल्याचा आरोप आहे. त्यामुळे मुलीच्या बाजूचे नातेवाईक आणि संबंधित व्यक्तींनी समीरला मारहाण केल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणात केवळ एकाच बाजूचे म्हणणे न ऐकता पोलिसांनी मुलगी आणि समीर या दोघांच्या बाजूंची माहिती घेतली आहे. त्यामुळे नेमका वाद कशातून निर्माण झाला आणि हल्ल्यावेळी कोणाची भूमिका होती, याचा तपास सुरू आहे.
माजी नगराध्यक्षासह दोघांना अटक
समीरच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी माजी नगराध्यक्ष संतोष देविदास कदम ऊर्फ परमेश्वर आणि संजय विलास जाधव या दोघांना अटक केली आहे. प्रणव देवकते, मस्के आणि अन्य दोन अनोळखी व्यक्तींचा शोध सुरू आहे.
या घटनेत समीर आणि त्याच्या सहकाऱ्याला घेऊन जाण्यासाठी वापरण्यात आलेले वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. या वाहनाच्या आधारेही तपास केला जात आहे. उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
हत्येमागील नेमके कारण आणि इतरांचा सहभाग तपासणार
अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पुंडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला त्रास दिल्याच्या कारणावरून संबंधित तरुणाला यापूर्वी समज देण्यात आली होती. मात्र, पुन्हा असा प्रकार घडल्याने मुलीच्या बाजूच्या व्यक्तींनी त्याला मारहाण केली. या हल्ल्यात समीरचा मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला अरबाज गंभीर जखमी झाला.
या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग होता, हल्ल्याचे नेमके स्वरूप काय होते आणि सर्व आरोपींची भूमिका काय होती, याचा पोलीस शोध घेत आहेत. एका तरुणाच्या हत्येमुळे तुळजापूर परिसरात खळबळ उडाली असून उर्वरित आरोपी कधी जेरबंद होणार, याकडे लक्ष लागले आहे.
