मोठी दुर्घटना! पुराच्या पाण्यात SDRF आणि अग्निशमन दलाच्या बोटी उलटल्या; १० जवान बेपत्ता…


तेलंगणा : दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर तेलंगणातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. खम्मम जिल्ह्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या मच्छिमारांना वाचवण्यासाठी गेलेल्या एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या बचाव पथकाला मोठ्या दुर्घटनेचा सामना करावा लागला. बचावकार्य सुरू असतानाच दोन बोटी उलटल्याने १० जवान बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

मच्छिमारांच्या बचावासाठी गेलेल्या पथकासोबत दुर्घटना

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील एका तलावात पुराच्या पाण्यामुळे काही मच्छिमार अडकले होते. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले होते.

जवानांकडून बचावकार्य सुरू असतानाच तलावातील पाण्याची पातळी अचानक वाढली. पाण्याचा प्रवाह अधिक वेगवान झाल्याने बचाव पथकाच्या दोन बोटी उलटल्या. या दुर्घटनेत अनेक जवान पाण्यात बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. काही जवान बोटीतून बचावकार्य करत होते, तर काही जण मच्छिमारांच्या शोधासाठी पाण्यात उतरले होते.

तीन जवानांची सुटका; बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध सुरू

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. या मोहिमेदरम्यान अग्निशमन दलाच्या तीन जवानांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र, अद्याप १० जवान बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती आहे.

बेपत्ता जवानांचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफचे सहा अतिरिक्त कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे चार जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच स्थानिक परिस्थितीची माहिती असलेल्या मार्गदर्शकांचीही मदत घेतली जात आहे.

बेपत्ता जवानांसाठी एनडीआरएफची टीम दाखल

दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एनडीआरएफची अतिरिक्त टीमही बचावकार्यासाठी पाचारण करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक आमदार घटनास्थळी पोहोचले असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

बेपत्ता जवानांचा शोध घेण्यासाठी मोटर बोटी आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने शोधमोहीम राबवली जात आहे. परिसरात मुसळधार पाऊस आणि पुराचे पाणी असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. तरीही प्रशासनाकडून शोधकार्य सुरू आहे.

या दुर्घटनेमुळे तेलंगणात हळहळ व्यक्त केली जात आहे. बेपत्ता जवानांचा लवकरात लवकर शोध लागावा, यासाठी बचाव पथकांकडून प्रयत्न सुरू आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!