आजारपणाचं कारण देत घेतली सुट्टी, पण करत होता भलताच उद्योग! पुणे पोलीस कर्मचाऱ्याचा कारनामा उघड

पुणे : कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचाच अमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आजारपणाचे कारण देत वैद्यकीय रजेवर गेलेल्या पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्याला तेलंगणात १२ किलो गांजासह अटक करण्यात आली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे पोलीस प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्याला थेट सेवेतून बडतर्फ केले आहे.

या कर्मचाऱ्याचे नाव नितीन ज्ञानू शिंदे असे असून, तो पुण्यातील विश्रामबाग वाहतूक विभागात पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत होता. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे ७ ऑक्टोबर २०२६ पासून आजारपणाचे कारण देत वैद्यकीय रजेवर होता. मात्र, या काळात तो अमली पदार्थांच्या आंतरराज्यीय तस्करीत सहभागी असल्याचे उघड झाले.

तेलंगणात १२ किलो गांजासह अटक
२५ ऑक्टोबर रोजी तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील नेक्कोंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई केली. या कारवाईदरम्यान नितीन शिंदे याला १२ किलो गांजासह पकडण्यात आले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

पुणे पोलीस दलाकडून थेट बडतर्फी
पोलीस दलात कार्यरत असताना अमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पुणे पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली. पुणे शहर पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त (प्रशासन) संजय पाटील यांनी नितीन शिंदे याला सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश दिले.

या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून, कायद्याचे रक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच गंभीर गुन्ह्यात सहभाग घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
