पुणेकरांसाठी दिवाळीची मोठी भेट! ‘या’ वयोगटातील नागरिकांना पीएमपी प्रवासात थेट ५० टक्के सूट; जाणून घ्या नवा नियम

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या ६० वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना आता तिकीट दरात ५० टक्के सवलत मिळणार आहे. येत्या १ नोव्हेंबर २०२६ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून, ज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठी निम्मेच भाडे द्यावे लागणार आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी ज्येष्ठ नागरिकांना पीएमपी बस प्रवासात अर्धे तिकीट लागू करण्याचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला पीएमपीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह पीएमआरडीए हद्दीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

या निर्णयानुसार पीएमपीच्या सर्व बस मार्गांवरील नियमित तिकीट दरात ५० टक्के सवलत लागू होईल. म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना यापुढे बस प्रवासासाठी निम्मे भाडे भरावे लागणार आहे.

७० रुपयांचा दैनिक पास आता ३५ रुपयांत!

दिवसभरात अनेकदा बसने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठीही महत्त्वाची सवलत जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी ७० रुपये असलेला पीएमपीचा दैनिक पास आता केवळ ३५ रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे नियमित बस प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या खर्चात बचत होणार आहे. तिकीट दरातील सवलतीसोबतच दैनिक पासच्या किमतीतही निम्मी कपात करण्यात आली आहे.
सवलतीचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक?
पीएमपीच्या या सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांचे वय ६० वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. प्रवासादरम्यान वयाचा पुरावा सोबत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी पॅनकार्ड किंवा पीएमपीने दिलेले ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र दाखवता येणार आहे. विशेष म्हणजे, वयाच्या पुराव्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कागदपत्रावर संपूर्ण जन्मतारीख नमूद असणे आवश्यक आहे.
या निर्णयामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे अधिक परवडणारे ठरणार आहे.
