पुण्याच्या अंगणात विदर्भाच्या भुलाबाई; कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विदर्भातील भुलाबाईंच्या गाण्यांची पुणेकरांनी अनुभवी भुरळ..


पुणे : नोकरी-व्यवसायानिमित्त गेल्या १० ते १५ वर्षांपासून पुण्यात स्थायिक झालेल्या विदर्भातील महिलांनी वैदर्भीय ठसक्यातील भुलाबाईच्या पारंपरिक गाण्यांचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला. धायरी परिसरातील डीएसके विश्व येथील गणपती मंदिरात आयोजित या कार्यक्रमात तीन ते साठ वयोगटांतील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत विदर्भाच्या लोकसंस्कृतीच्या आठवणींना उजाळा दिला.

शिक्षिकेपासून डॉक्टरपर्यंत आणि गायिकेपासून संशोधकापर्यंत विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या या महिलांनी भुलाबाईच्या गाण्यांतून आपल्या मातीचा सुगंध पुन्हा अनुभवता आल्याची भावना व्यक्त केली. पुण्यात वास्तव्यास असताना कोजागरी पौर्णिमेनिमित्त भोंडला साजरा केला जात असला, तरी वऱ्हाडी बाजाची भुलाबाईची गाणी त्यांच्या मनात कायम रेंगाळत होती. माहेरची ओढ आणि आपल्या बोलीभाषेची गोडी जपत या उपक्रमातून त्यांनी आपल्या सांस्कृतिक मुळांशी पुन्हा नाळ जोडली.‘सासरच्या वाटेवर बोचतात काटे’पेक्षा ‘सासरच्या वाटे कुचूकुचू काटे’ या वऱ्हाडी शब्दांतून व्यक्त होणारी आपुलकी आणि भाषेतील गोडवा अनुभवताना उपस्थित महिला जुन्या आठवणींत रमल्या.

‘पहिली गं भुलाबाई’, ‘कारल्याचं बी पेर गं सूनबाई’, ‘नदीच्या काठी राळा पेरला’, ‘आला माझ्या माहेरचा वैद्य’, ‘एक लिंबू झेलू बाई’, ‘अडकीत जाऊ, खिडकीत जाऊ’ अशा पारंपरिक गाण्यांवर महिलांनी फेर धरला. शेवटी प्रत्येक महिलेने घरून आणलेल्या खाऊचे खिरापत म्हणून वाटप करण्यात आले.

महाराष्ट्राची संस्कृती समान असली, तरी प्रदेशानुसार बोलीभाषा, खाद्यसंस्कृती आणि काही विधींमध्ये फरक जाणवतो. पुण्यातील भोंडल्यात मध्यभागी हत्तीची प्रतिकृती ठेवून फेर धरला जातो, तर भुलाबाईच्या पूजेत मांडीवर बालगणेश असलेल्या पार्वतीसह शंकराच्या मूर्तीची पूजा केली जाते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुप्रिया अनासाने, स्वप्ना देशमुख, श्वेता पटवर्धन, मंजिरी बनारसे, साक्षी देशपांडे, क्षिप्रा देशमुख आदींनी परिश्रम घेतले. या उपक्रमातून विदर्भातील पारंपरिक लोकगीतांचे जतन करत महिलांनी पुण्याच्या अंगणात आपल्या माहेरच्या संस्कृतीचा सुगंध दरवळवला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!