विमान दिल्लीत उतरताच अभिजीत दिपकेंभोवती पोलिसांचा फास! महिला अधिकारी थेट विमानात, ‘बॅग तरी घेऊ द्या’ म्हणत दिपके वैतागले; नेमकं काय घडलं?


दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यासाठी दिल्लीला पोहोचलेल्या कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी विमानतळावरच ताब्यात घेतलं. शनिवारी सकाळी साडेदहा ते पावणेअकराच्या सुमारास त्यांचं विमान धावपट्टीवर उतरलं. विमान थांबताच पोलिसांचं पथक आत दाखल झालं. परिसरात दिल्ली पोलीस, वरिष्ठ अधिकारी आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा मोठा बंदोबस्त आधीपासूनच तैनात होता.

महिला अधिकारी समोर येताच दिपके म्हणाले, ‘बॅग तरी घेऊ द्या!’

विमानातील प्रवाशांना बाहेर पडू न देता पोलिसांनी सर्वप्रथम अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्याकडे मोर्चा वळवला. तिघेही जवळच्या आसनांवर बसले होते. महिला पोलीस अधिकारी पुढे आल्यावर दिपके यांनी पुरुष पोलिसांना पुढे करण्याची विनंती केली. ‘आम्ही अटक व्हायला तयार आहोत. मला माझी बॅग तरी घेऊ द्या,’ असं ते म्हणाल्याची माहिती आहे. मात्र, पोलिसांनी त्यांना सामान घेण्यासाठी वेळ न देता तिघांनाही विमानातून बाहेर काढलं. त्यानंतर एका बसमधून त्यांना विमानतळाबाहेरील दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आलं. ही कारवाई पूर्ण झाल्यानंतर इतर प्रवाशांना बाहेर पडू देण्यात आलं.

मुंबईतून दिल्लीपर्यंत मोकळा प्रवास; विमानतळावर मात्र अडवणूक

दिपके मुंबईहून दिल्लीला येताना किंवा हॉटेलमधून विमानतळाकडे जाताना त्यांना अडवण्यात आलं नव्हतं. मात्र, दिल्लीच्या हद्दीत विमान उतरताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याची तयारी पूर्ण केली होती. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जंतरमंतरवर सीजेपी आंदोलन सुरू करणार होती. यापूर्वीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी पोलिसांनी आधीच मोठा बंदोबस्त केल्याचं दिसून आलं. यूट्यूबर ध्रुव राठी यालाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे.

आंदोलनाचं काय होणार? पोलिसांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष

दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना किती काळ ताब्यात ठेवण्यात येणार, त्यांना नेमकं कुठे नेण्यात आलं आणि जंतरमंतरवरील आंदोलन होणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. विमानतळावरच झालेल्या या कारवाईमुळे दिल्लीतील आंदोलनाच्या घडामोडींना वेगळं वळण मिळालं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!