पावसाळा संपण्याच्या मार्गावर! हवामान विभागाची मोठी घोषणा होणार; पण, २५ राज्यांवर मोठं संकट


मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अनेक भागांत गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. सप्टेंबरच्या अखेरीस तरी पाऊस पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, आता सप्टेंबर महिना संपत आला असून, राज्यातील अनेक भागांत अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अशातच राज्यातून मान्सूनची माघार सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत.

नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात आगामी काळात पावसाची शक्यता नाही. त्यामुळे लवकरच हवामान विभागाकडून पावसाळा संपल्याची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. येत्या एक-दोन दिवसांत याबाबत घोषणा होऊ शकते.

पाणी जपून वापरण्याचे आवाहन

नागपूरसह संपूर्ण विदर्भात ऑक्टोबर हीटचा प्रभाव जाणवू लागला आहे. नागपूरचे कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचले आहे, तर अमरावतीचे तापमान ३६ अंशांच्या पुढे गेले आहे. वाढत्या तापमानामुळे उन्हाचा तडाखा जाणवत असून, विदर्भात पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचा जपून वापर करण्याचे आवाहन प्रवीण कुमार यांनी केले आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा

छत्रपती संभाजीनगर शहरात पावसाळा सुरू असतानाही उन्हाचा तडाखा जाणवत आहे. सलग दुसऱ्या दिवशी शहराचे कमाल तापमान ३५.६ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. तर किमान तापमान २१.५ अंश आणि आर्द्रता ४४ टक्के नोंदवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ३० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान शहरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाच्या एक-दोन हलक्या सरी कोसळू शकतात. मात्र, सध्या पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.

सिंधुदुर्गात पावसाची माघार, थंडीची चाहूल

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २५ ते ३० दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यातच सकाळच्या सत्रात थंडीचा कडाका वाढू लागला असून, जिल्ह्यात अनेक ठिकाणी दाट धुके पाहायला मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यात पावसाची माघार आणि गुलाबी थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. सामान्यतः कोकणात ऑक्टोबरच्या अखेरीस किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला थंडीला सुरुवात होते. मात्र, यंदा सप्टेंबरमध्येच थंडीची चाहूल लागल्याने हवामानातील बदल जाणवत आहेत.

देशातील २५ राज्यांत पावसाचा अंदाज

महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी असली, तरी देशातील इतर २५ राज्यांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिल्ली-एनसीआर, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश, बिहार, मेघालय, आसाम आणि झारखंडसह विविध राज्यांत पावसाची शक्यता आहे. काही भागांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून, काही राज्यांत वेगाने वारे वाहण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!