पुण्याहून दिवाळी-छठसाठी ७ स्पेशल ट्रेन! हडपसर, पुणे, कोल्हापूरहून कुठे-कुठे धावणार? तिकिट बुकिंग सुरू..

पुणे : दिवाळी आणि छठ सणांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन पुणे रेल्वे विभागाने सात विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांच्या एकूण २१६ फेऱ्या होणार असून, हडपसर, पुणे आणि कोल्हापूरहून विविध मार्गांवर या सेवा उपलब्ध असतील. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात या विशेष गाड्या धावणार आहेत.
हडपसर-गाझीपूर सिटी द्वि-साप्ताहिक विशेष गाडीच्या २४ फेऱ्या होणार आहेत. १३ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबरदरम्यान दर मंगळवार आणि शुक्रवार हडपसरहून ही गाडी सुटेल.

परतीच्या प्रवासात १५ ऑक्टोबर ते २२ नोव्हेंबरदरम्यान दर गुरुवार आणि रविवारी सेवा उपलब्ध असेल. दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, प्रयागराज छिवकी, वाराणसी आणि जौनपूर आदी ठिकाणी या गाडीला थांबे असतील.


नागपूर-हडपसर द्वि-साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडीच्या २६ फेऱ्या होणार आहेत. ८ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबरदरम्यान नागपूरहून दर सोमवार आणि गुरुवारी, तर ९ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबरदरम्यान हडपसरहून दर मंगळवार आणि शुक्रवारी ही गाडी धावेल. याशिवाय नागपूर-हडपसर साप्ताहिक विशेष गाडीच्या १४ फेऱ्या होणार आहेत.
हडपसर-गोरखपूर दैनिक विशेष गाडीच्या सर्वाधिक ६४ फेऱ्या होणार आहेत. १६ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबरदरम्यान हडपसरहून, तर १७ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबरदरम्यान गोरखपूरहून ही गाडी धावेल. दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, झाशी, कानपूर, लखनौ आणि गोंडा आदी ठिकाणी या गाडीला थांबे असतील.
पुणे-न्यू अमरावती साप्ताहिक विशेष गाडीच्या १२ फेऱ्या, तर कोल्हापूर-कलबुरगी विशेष गाडीच्या ६४ फेऱ्या होणार आहेत. कोल्हापूर-कलबुरगी विशेष गाडी शुक्रवार वगळता दररोज धावेल. याशिवाय मुंबई-कोल्हापूर साप्ताहिक विशेष गाडीच्या १२ फेऱ्याही उपलब्ध असतील.
गाड्यांचे आरक्षण सुरू
१४३१, ०१२०१ आणि ०१४१७ या गाड्यांचे आरक्षण २७ सप्टेंबरपासून सुरू झाले आहे. तर ०१२०९, ०१४१५, ०१४०३ आणि ०१४५१ या गाड्यांचे आरक्षण २८ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. प्रवाशांना संगणकीकृत प्रवासी आरक्षण केंद्रे तसेच ‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावरून तिकिटांचे आरक्षण करता येणार आहे.
