लाडक्या ‘लालपरी’बाबत मोठा निर्णय! डिझेलच्या धुराड्यांपासून सुटका, २०२७ पासून एसटीचे चित्र पालटणार

मुंबई : महाराष्ट्राची लोकवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटीची ‘लालपरी’ आता नव्या रूपात धावण्यासाठी सज्ज होत आहे. एसटी महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या ३१२व्या संचालक मंडळाच्या बैठकीत २०२७ पासून जुन्या बसेसचे टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक बसेसमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या एसटीच्या सुमारे १४ हजार बसेसच्या ताफ्यात १,१०० ई-बसेस आहेत. डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
डिझेल बसेसचे सुमारे १५ वर्षांचे आयुर्मान लक्षात घेता, एसटीच्या सुमारे ५ हजार जुन्या बसेस टप्प्याटप्प्याने स्क्रॅप केल्या जाणार आहेत. त्यातील काही बसेसचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. दरम्यान, ई-बसेससाठी आवश्यक चार्जिंग पायाभूत सुविधांची उभारणीही आगारनिहाय सुरू करण्यात आली आहे. २०३७ पर्यंत एसटीचा संपूर्ण ताफा इलेक्ट्रिक करण्याचे नियोजन असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

२०२७ पासून जुन्या बसेसचे ई-बसमध्ये रूपांतर
सात ते आठ वर्षे वापर झालेल्या जुन्या बसेसचे २०२७ पासून टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक बसेसमध्ये रूपांतर करण्याची मोहीम सुरू केली जाणार आहे. यासोबतच प्रवाशांची गरज लक्षात घेऊन नव्या ई-बसेसचीही मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात येणार आहे.


सध्या डिझेल बसेसचे आयुर्मान सुमारे १५ वर्षे आहे, तर ई-बसेसचे आयुर्मान सुमारे २० वर्षे असल्याने इलेक्ट्रिक बसेसचा अधिक काळ वापर करता येणार आहे. तसेच डिझेलवरील अवलंबित्व कमी झाल्याने इंधन खर्चात बचत होण्याची अपेक्षा आहे.
चार्जिंग स्टेशन उभारणीला वेग
ई-बसेसची संख्या वाढवताना आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन, विद्युत पायाभूत सुविधा आणि तांत्रिक यंत्रणा उभारण्याचे कामही समांतरपणे केले जाणार आहे. आगारनिहाय नियोजन करून ई-बसेसची खरेदी आणि चार्जिंग सुविधांची उभारणी या दोन्ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत.
याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, एसटी ही महाराष्ट्रातील प्रत्येक गावाला जोडणारी सार्वजनिक सेवा आहे. त्यामुळे तिचे आधुनिकीकरण करताना पर्यावरणाची जबाबदारीही महत्त्वाची आहे. डिझेलवरील अवलंबित्व कमी करून स्वच्छ, हरित आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याचा संकल्प असून, २०३७ पर्यंत एसटीचा १०० टक्के ताफा इलेक्ट्रिक करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही सुरू आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ भविष्यात ‘ई-लालपरी’ म्हणून ओळखली जाईल. पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीचे देशातील आदर्श मॉडेल महाराष्ट्रात उभारण्याच्या दिशेने एसटीची वाटचाल सुरू असल्याचा विश्वासही सरनाईक यांनी व्यक्त केला.
