केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयलच्या ‘चुलत भावाचं’ कनेक्शन; इन्स्टाग्राम अकाऊंटमधून केतनला जाळ्यात ओढलं?

पुणे : पुण्यातील लोहगड किल्ल्यावरून धक्का देऊन केतन अग्रवाल याची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणात पोलिसांनी तब्बल ५,०५३ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रातून पोलिसांच्या तपासात समोर आलेले अनेक महत्त्वाचे धागेदोरे उघड झाले आहेत.
दरम्यान, केतनच्या हत्येपूर्वी सियाने वापरलेला फोन पोलिसांच्या हाती लागला. सियाने हा फोन फोडून ड्रॉवरमध्ये ठेवला होता. पोलिसांनी तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला. या तपासणीतून काही महत्त्वाची माहिती समोर आली असून, त्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

युजर आयडी आणि पासवर्ड बदलून तयार केले अकाऊंट
चार्जशीटमध्ये नमूद केल्यानुसार, सियाने तिच्या चुलत भावाकडून एक इन्स्टाग्राम अकाऊंट घेतले होते. त्यानंतर त्याचा युजर आयडी आणि पासवर्ड बदलून ‘माही’ या नावाने अकाऊंट तयार करण्यात आले. या अकाऊंटवर सियाने तिच्या मैत्रिणीचा फोटो तिच्या परवानगीशिवाय वापरल्याचेही तपासात समोर आले आहे.


चेतनकडेही या अकाऊंटचा अॅक्सेस असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. ‘मी सियाची मैत्रीण आहे आणि १९ जूनला तिचा वाढदिवस असल्याने तिला १८ जूनला लोहगडावर नेऊन सरप्राईज देऊया’, असा संदेश या अकाऊंटवरून केतनला पाठवण्यात आला होता. हत्येनंतर हे इन्स्टाग्राम अकाऊंट डिलिट करण्यात आल्याचेही पोलिसांनी चार्जशीटमध्ये नमूद केले आहे.
गळ्यात वरमाला घातलेला फोटो सापडला
तपासादरम्यान राजस्थानमधील खाटूश्याम मंदिरातील एक फोटो पोलिसांच्या हाती लागला. या फोटोमध्ये सिया आणि केतन यांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातलेली दिसत आहे. मात्र, दोघांनी प्रत्यक्षात लग्न केले होते, याचा ठोस पुरावा पोलिसांना तपासात आढळला नाही.
पोलिसांनी हा फोटो चार्जशीटचा भाग केला आहे. तसेच या प्रकरणात ८० हून अधिक साक्षीदारांचे जबाब क्रॉस-व्हेरिफाय करण्यात आल्याचेही समोर आले आहे.
कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा प्रयत्न?
दरम्यान, केतनला अपंग करण्यासाठी किंवा त्याची हत्या करण्यासाठी रितेशने बंगळुरूमधील एका मित्राशी संपर्क साधल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र, त्या मित्राने हे काम करण्यास स्पष्ट नकार दिला. या व्यक्तीचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे.
या जबाबासह चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आलेल्या इतर पुराव्यांच्या आधारे केतनला लक्ष्य करण्याचा कट आधीपासूनच आखण्यात आला होता का, याचा तपास पोलिसांनी केला आहे.
