लग्नासाठी 45 लाख खर्च, 10 तोळे सोनं तरीही हुंड्याची मागणी; रात्री नवऱ्याची धमकी, पहाटे IT इंजिनियर पत्नीचा मृतदेह, उंड्रीतील वैष्णवी प्रकरणाला धक्कादायक वळण!

पुणे : लग्नाला अवघे काही महिने झाले असताना उंड्रीमध्ये 23 वर्षीय आयटी इंजिनियर वैष्णवी जरांडे हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. वैष्णवीने आत्महत्या केल्याचे सासरच्या मंडळींकडून सांगण्यात आले असले, तरी तिच्या आई-वडिलांनी हुंड्यासाठी छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. लग्नात तब्बल 45 लाख रुपये खर्च करून आणि 10 तोळे सोनं देऊनही सासरच्या मंडळींकडून कार घेण्यासाठी आणखी 5 लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी वैष्णवीच्या आई-वडिलांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैष्णवीचं लग्न 9 मे 2026 रोजी ओंकार संजय घिसरे याच्यासोबत झालं होतं. वैष्णवी बंगळुरूतील एका आयटी कंपनीत नोकरी करत होती. लग्नानंतर काही काळ ती वर्क फ्रॉम होम करत होती. याच काळात सासरी तिचा सातत्याने छळ केला जात असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. माहेरच्यांनी लग्नासाठी मोठा खर्च केला, मुलीला 10 तोळे सोनं दिलं, तरीही सासरच्यांची कथित पैशांची मागणी सुरूच राहिली. कार खरेदीसाठी आणखी 5 लाख रुपये माहेरून आणावेत, अशी मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे.

मृत्यूच्या काही तास आधी आईला फोन


वैष्णवीच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी रात्री सव्वानऊच्या सुमारास तिने आईला फोन केला होता. सासरी आपल्याला खूप त्रास होत असल्याचं तिने आईला सांगितल्याचं कुटुंबीयांनी तक्रारीत नमूद केलं आहे. त्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास वैष्णवीच्या नवऱ्याचा तिच्या माहेरच्यांना फोन आला.
‘तुमच्या मुलीला घरी घेऊन जा, नाहीतर माझ्याकडून काहीतरी बरेवाईट होईल’, असं त्याने फोनवर सांगितल्याचा आरोप आहे. हा फोन आल्यानंतर वैष्णवीच्या आई-वडिलांनी तिला पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचा फोन लागत नव्हता. त्यामुळे घाबरलेल्या आई-वडिलांनी तातडीने पुण्याचा रस्ता धरला.
पहाटे सासरी पोहोचले अन् धक्कादायक दृश्य समोर
आई-वडील पुण्यात पोहोचेपर्यंत पहाट झाली होती. वैष्णवीला काही झालं तर नाही ना, या भीतीने ते सासरी पोहोचले. मात्र, तिथे त्यांना वैष्णवीचा मृतदेह गोधडीत गुंडाळलेल्या अवस्थेत दिसला. मुलीचा मृतदेह पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
वैष्णवीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं सासरच्या मंडळींकडून सांगण्यात आलं. मात्र, मृत्यूच्या काही तास आधी तिने आईला केलेला फोन, त्यानंतर नवऱ्याकडून आलेला धमकीवजा फोन आणि हुंड्यासाठी कथित 5 लाख रुपयांची मागणी या घटनांमुळे वैष्णवीच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
वैष्णवीने खरंच आत्महत्या केली की तिच्या मृत्यूमागे आणखी काही कारण आहे? या प्रकरणाचा तपास आता पोलिसांकडून केला जात असून, आई-वडिलांच्या तक्रारीनंतर दाखल झालेल्या गुन्ह्यात पुढील तपासातून मृत्यूमागचं नेमकं सत्य समोर येणार आहे.