राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! मेघगर्जना अन् वादळी वाऱ्यासह पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना यलो-अन ऑरेंज अलर्ट

मुंबई : राज्यातील काही भागांत पावसाने विश्रांती घेतली असतानाच हवामानाची स्थिती पुन्हा बदलताना दिसत आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव महाराष्ट्रावर जाणवण्याची शक्यता असून, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही जिल्ह्यांत मुसळधार पावसासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही भागांत यलो तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर
24 सप्टेंबर रोजी बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या भागांत जोरदार वारे, मेघगर्जना आणि विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता अधिक असल्याने काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू
दरम्यान, देशासह महाराष्ट्रातूनही मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. देशाच्या वायव्य भागातून मॉन्सून माघारी फिरला आहे. उत्तर प्रदेशात समुद्रसपाटीपासून 1.5 ते 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे.


याशिवाय बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीपासून अंदमान समुद्र ते थायलंडच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या प्रणालीपासून अरबी समुद्रापर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा आता निवळला आहे. या बदलत्या हवामान प्रणालींच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
विदर्भातील ‘या’ 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
24 सप्टेंबर रोजी यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हिंगोली, नांदेड, वर्धा, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांतही जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. जालना, बीड आणि धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. उर्वरित विदर्भ आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणात कुठे पाऊस?
कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांत पावसाचा जोर तुलनेने कमी राहण्याचा अंदाज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मात्र यलो अलर्ट देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रात काही भाग कोरडे
उत्तर महाराष्ट्रात विभागनिहाय हवामानात बदल पाहायला मिळणार आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाटमाथा परिसरात हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे. अहिल्यानगरमध्येही विजांसह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथा परिसरात विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागांसाठी यलो अलर्टचा अंदाज आहे. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतही विजांसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाड्यात ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत पावसासोबत मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विदर्भातील जिल्हानिहाय अलर्ट
अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यांत यलो अलर्टचा अंदाज आहे. तर नागपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
एकूणच, 24 सप्टेंबर रोजी राज्यात विभागनिहाय हवामान बदलणार असून विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणातील काही भागांत हलका पाऊस, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत कोरडे हवामान, तर पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर विजांसह पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी स्थानिक हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष ठेवावे.