विसर्जनाच्या दिवशी गाडी घेऊन बाहेर पडणार असाल तर सावधान! पुण्यात प्रमुख रस्ते बंद; वाहतूक ‘या’ मार्गाने वळवली


पुणे : पुण्यात लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या या सोहळ्यात मोठी वाहतूक कोंडी होऊ नये आणि विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडावी, यासाठी पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने विशेष वाहतूक नियोजन केले आहे.

येत्या 25 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून विसर्जन मिरवणूक पूर्ण होईपर्यंत मध्यवर्ती पुण्यातील अनेक प्रमुख रस्ते सर्वसामान्य वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे त्या दिवशी शहरात बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी बंद मार्ग आणि पर्यायी वाहतूक व्यवस्थेची माहिती घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

चार प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीला बंदी

विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी मध्य पुण्यात मानाचे गणपती तसेच विविध सार्वजनिक मंडळांचे गणपती पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक गर्दी करतात. ही गर्दी लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता आणि टिळक रस्ता या प्रमुख मार्गांवर सर्वसामान्य वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे.

याशिवाय मिरवणुकीच्या मार्गावरील कुमठेकर रस्ता, गणेश रस्ता आणि केळकर रस्ता हे मार्गही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

या मार्गांवरील वाहतूकही थांबवली जाणार

गर्दीचा ताण नियंत्रणात ठेवण्यासाठी शास्त्री रस्ता, कर्वे रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता आणि गुरुनानक रस्ता या मार्गांवरील वाहतूकही मिरवणूक संपेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता आणि कुमठेकर परिसरात मोठ्या प्रमाणावर पादचारी गर्दी होण्याची शक्यता असल्याने परिस्थितीनुसार या मार्गांना जोडणारे अंतर्गत रस्ते आणि गल्ल्यांमधील वाहतूकही वळवली जाणार आहे.

स्वतःचे वाहन घेऊन मध्यवर्ती पुण्यात जाणे टाळा

विसर्जनाच्या दिवशी वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी नागरिकांना शक्यतो दुचाकी किंवा चारचाकी वाहन घेऊन मध्यवर्ती शहरात न जाण्याचे आवाहन केले आहे.

अत्यावश्यक कामासाठी प्रवास करणे गरजेचे असल्यास मुख्य रस्त्यांचा वापर न करता पोलिसांनी निश्चित केलेले पर्यायी मार्ग, रिंग रोड आणि डायव्हर्शन पॉईंटचा वापर करावा, असे पोलिसांनी सांगितले आहे.

नो-पार्किंगमध्ये वाहन लावल्यास कारवाई

विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी रस्त्याच्या कडेला किंवा नो-पार्किंग क्षेत्रात वाहने पार्क करू नयेत. नियमांचे उल्लंघन केल्यास वाहन टोईंग करण्यासह दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.

महापालिका आणि पोलिसांनी निश्चित केलेल्या अधिकृत पार्किंगच्या ठिकाणीच वाहने पार्क करावीत. घराबाहेर पडण्यापूर्वी वाहतुकीचे ताजे अपडेट तपासून आणि वेळेचे योग्य नियोजन करूनच प्रवास करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

वाहतुकीसाठी पर्यायी रिंग रोड

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी खालील पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे :

कर्वे रोड → नळस्टॉप चौक → लॉ कॉलेज रोड → सेनापती बापट रोड → सेनापती बापट रोड जंक्शन → गणेशखिंड रोड → सिमला ऑफिस चौक → संचेती हॉस्पिटल चौक → इंजिनिअरिंग कॉलेज चौक → आंबेडकर रोडवरील शाहीर अमर शेख चौक → मालधक्का चौक → बोल्हाई चौक → नरपतगिरी चौक → नेहरू रोडवरून संतकबीर पोलीस चौकी → सेक्शन लष्कर चौक → शिवनेरी रोडवरून गुलटेकडी मार्केटयार्ड → मार्केटयार्ड जंक्शन → सातारा रोडने व्होल्गा चौक (लक्ष्मीनारायण सिनेमा) → सिंहगड रोडने मित्रमंडळ चौक → सावरकर चौक → सिंहगड रोड जंक्शन → लाल बहादूर शास्त्री रोडने सेनादत्त पोलीस चौकी → अनंत कान्हेरे पथ → म्हात्रे पूल → नळस्टॉप.

गणपती विसर्जनासाठी महत्त्वाचे डायव्हर्शन पॉईंट

1) जंगली महाराज रोड – झाशी राणी चौक
2) शिवाजी रोड – काकासाहेब गाडगीळ पुतळा
3) मुदलियार रोड – अपोलो टॉकीज / दारूवाला पूल
4 ) लक्ष्मी रोड – संत कबीर पोलीस चौकी
5) सोलापूर रोड – सेक्शन लष्कर चौक
6 ) सातारा रोड – व्होल्गा चौक
7 ) बाजीराव रोड – सावरकर पुतळा चौक
8 ) लाल बहादूर शास्त्री रोड – सेनादत्त पोलीस चौकी
9 ) रोड – नळस्टॉप
10) फर्ग्युसन कॉलेज रोड – गुडलक चौक

त्यामुळे 25 सप्टेंबर रोजी मध्यवर्ती पुण्यात प्रवास करणाऱ्या नागरिकांनी वाहतूक बदलांची माहिती घेऊनच घराबाहेर पडावे, तसेच शक्य असल्यास सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असे आवाहन पुणे वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!