भाजपात मोठी उलटापालट! महाराष्ट्राची धुरा पांडांकडे, तावडेंना यूपीची जबाबदारी; चार मराठी नेत्यांना महत्त्वाची पदं


नवी दिल्ली : भाजपने पक्षसंघटनेत मोठ्या प्रमाणावर फेरबदल करत राज्यनिहाय प्रभारी आणि सहप्रभारींची नवी यादी जाहीर केली आहे. या बदलात महाराष्ट्रातील चार नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राची जबाबदारी बैजयंत जय पांडा यांच्याकडे सोपवण्यात आली असून, त्यांच्या मदतीसाठी अमित मालवीय, सदानंद शेट तानावडे आणि कमलजीत सहरावत यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या फेरबदलात महाराष्ट्राचे नेते विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशची प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. तावडेंसोबत जगदीश पटेल, मेधा कुलकर्णी, प्रदीप शर्मा आणि अनंत ओझा यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तावडे आणि मेधा कुलकर्णी हे दोन्ही नेते आता उत्तर प्रदेशातील संघटनात्मक कामात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

महाराष्ट्रातून भारती पवार यांच्यावरही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली असून त्यांची गोव्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे, विनय सहस्रबुद्धे यांच्याकडे दिल्लीची जबाबदारी देण्यात आली आहे. म्हणजेच नव्या यादीत महाराष्ट्रातील नेत्यांचा राष्ट्रीय संघटनात्मक पातळीवरील सहभाग कायम ठेवण्यात आला आहे.

भाजपच्या नव्या यादीत केवळ महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशच नव्हे, तर देशभरातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांसाठी प्रभारी-सहप्रभारी निश्चित करण्यात आले आहेत. स्मृती इराणी यांच्याकडे हरियाणा आणि छत्तीसगडची जबाबदारी देण्यात आली आहे. सुनील बन्सल यांच्याकडे पश्चिम बंगाल आणि तेलंगणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हरीश द्विवेदी बिहार आणि कर्नाटकचे प्रभारी असतील, तर राम माधव यांच्याकडे तामिळनाडू आणि उत्तराखंडची जबाबदारी देण्यात आली आहे.

याशिवाय गुजरातसाठी तरुण चुग, हिमाचल प्रदेशसाठी श्रीकांत शर्मा, राजस्थानसाठी संजय भाटिया, पंजाब आणि जम्मू-काश्मीरसाठी सतीश पूनिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ओडिशाची जबाबदारी डी. पुरंदेश्वरी, केरळची एम. नागराजा आणि मध्य प्रदेशची जबाबदारी बाबूलाल कुमार देव यांच्याकडे देण्यात आली आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर फेरबदल सुरू आहेत. नव्या नियुक्त्यांमधून आगामी निवडणुका आणि राज्यनिहाय संघटन मजबूत करण्यासाठी जबाबदाऱ्यांची नव्याने आखणी करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील नवी टीम आणि उत्तर प्रदेशात विनोद तावडे यांच्या नेतृत्वाखालील संघटनात्मक रचना आता कशी काम करते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!