गणेशोत्सवात Pune Metro झाली मालामाल! केवळ २ दिवसांत मिळाला ‘इतक्या’ कोटींचा महसूल..

पुणे : गणेशोत्सवाच्या काळात मध्यवर्ती पुण्यात वाढणारी गर्दी, वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या टाळण्यासाठी पुणेकरांनी मेट्रोला मोठी पसंती दिल्याचे दिसून येत आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत तब्बल ८ लाख ७७ हजार ३७७ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. या प्रवासातून पुणे मेट्रोला १ कोटी ११ लाख ७४ हजार ५०८ रुपयांचा महसूल मिळाला.
शनिवारी मेट्रो स्थानकांवर प्रवाशांची सर्वाधिक गर्दी पाहायला मिळाली. या दिवशी तब्बल ४ लाख ७८ हजार ४७७ प्रवाशांनी मेट्रोचा प्रवास केला. यातून मेट्रोला ६० लाख २५ हजार २७१ रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर रविवारी ३ लाख ९८ हजार ९०० प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला असून, या दिवशी ५१ लाख ४९ हजार २३७ रुपयांचा महसूल जमा झाला.

स्वारगेट-पिंपरी मार्गावर सर्वाधिक गर्दी..
गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची सर्वाधिक पसंती स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मार्गाला मिळाली. दोन दिवसांत या मार्गावरून तब्बल ४ लाख ९८ हजार ७६२ प्रवाशांनी प्रवास केला. मध्यवर्ती पुण्यातील पेठांमध्ये गणपती दर्शनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला.


दुसरीकडे, वनाज ते रामवाडी या मार्गावर शनिवारी २ लाख ९ हजार ५३९, तर रविवारी १ लाख ६९ हजार ७६ प्रवाशांनी प्रवास केला.
गणेशोत्सवातील वाढती गर्दी लक्षात घेऊन मेट्रो प्रशासनाने फेऱ्यांची संख्या आणि सेवेची वेळ वाढवली आहे. वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्येपासून वाचण्यासाठी नागरिकांकडून खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीला, विशेषतः मेट्रोला, प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती पुण्यातील गर्दी वाढत असताना उपनगरांमधून शहराच्या मध्यवर्ती भागात पोहोचण्यासाठी पुणेकरांचा मेट्रोकडे कल वाढला आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून मेट्रोच्या प्रवासीसंख्येत सातत्याने वाढ होत असून, अवघ्या चार दिवसांत दैनंदिन प्रवासीसंख्येत १ लाख १० हजारांहून अधिक वाढ झाली आहे. प्रवासीसंख्या वाढल्याचा परिणाम मेट्रोच्या दैनंदिन महसुलावरही झाल्याचे दिसून येत आहे.