शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! खात्यात 2 हजार रुपये जमा होणार; हप्ता मिळण्याआधी ‘ही’ कामे करा..

मुंबई : देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत 23 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून आता 24 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. या हप्त्याच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गाचे लक्ष आता 24 व्या हप्त्याकडे लागले आहे.
पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता नेमका कधी जमा होणार, याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, या योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मात्र, 24 वा हप्ता मिळण्यापूर्वी शेतकऱ्यांनी काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.

23 वा हप्ता कधी झाला जारी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 जून 2026 रोजी पश्चिम बंगालमधील तारकेश्वर येथून पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता जारी केला होता. यावेळी 9.44 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 18,880 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट जमा करण्यात आली.


प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी हप्ता दिला जातो. त्यामुळे जून महिन्यात 23 वा हप्ता मिळाल्यानंतर पुढील म्हणजेच 24 वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. मात्र, केंद्र सरकारकडून 24 व्या हप्त्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
पीएम किसान योजनेचा लाभ कोणाला मिळतो?
पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना वर्षाला एकूण 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम वर्षातून तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2 हजार रुपये याप्रमाणे थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBTच्या माध्यमातून आधारशी संबंधित बँक खात्यात जमा केली जाते.
ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली. आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत देण्यात आली आहे.
24 वा हप्ता मिळण्यासाठी ‘ही’ कामे पूर्ण करा
24 वा हप्ता मिळण्यात अडचण येऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण करून ठेवणे गरजेचे आहे.
ई-केवायसी पूर्ण करा: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया महत्त्वाची आहे. ई-केवायसी अपूर्ण असल्यास हप्ता अडकण्याची शक्यता असते.
बँक खाते आधारशी लिंक करा: पीएम किसानचा निधी DBTच्या माध्यमातून जमा होत असल्याने लाभार्थ्यांचे बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे.
जमिनीच्या नोंदी तपासा: पीएम किसान पोर्टलवरील जमिनीच्या नोंदींची पडताळणी पूर्ण आहे की नाही, हे शेतकऱ्यांनी तपासून घ्यावे.
एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांनी लाभ घेतल्यास?
पीएम किसान योजनेच्या नियमांनुसार पात्रतेच्या अटींचे पालन करणे आवश्यक आहे. एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक व्यक्ती चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळल्यास संबंधित लाभाबाबत कारवाई होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबातील लाभार्थी नोंदणी आणि पात्रता तपासून घेणे महत्त्वाचे आहे.
त्यामुळे 24 वा हप्ता खात्यात जमा होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी ई-केवायसी, आधार-बँक लिंक आणि जमिनीच्या नोंदींची पडताळणी यांसारख्या आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून ठेवाव्यात.